नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या सुरळीत झालेल्या परीक्षाप्रणालीला मंगळवारी अचानक धक्का बसला. हिवाळी परीक्षांमधील तिस-या टप्प्याची सुरुवातच विद्यार्थ्यांसाठी धावपळ व मन:स्तापाची ठरली. काही परीक्षा केंद्रांवर ‘बीकॉम’च्या विद्यार्थ्यांचे आसन क्रमांकच नसल्याचे चित्र होते. तर शेकडो विद्यार्थ्यांना परीक्षेच्या अवघ्या २ तासअगोदर परीक्षा ओळखपत्रे मिळाली. महाविद्यालयांनी ऐनवेळी परीक्षा अर्ज भरल्यामुळे हा गोंधळ झाल्याचा दावा विद्यापीठातर्फे करण्यात आला आहे. मात्र या प्रकारामुळे महाविद्यालय व विद्यापीठ यांच्यामधील समन्वयाचा अभाव समोर आला आहे.
मंगळवारी ‘बीकॉम’च्या प्रथम सत्र परीक्षांना प्रारंभ झाला. वसंतराव नाईक शासकीय समाजविज्ञान संस्थेत विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र होते. सुमारे ४० ते ५० विद्यार्थ्यांना मात्र परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर धक्काच बसला. कारण त्यांचा आसनक्रमांक सूचनाफलकावर नमूदच नव्हता. परीक्षा ओळखपत्रावर हेच परीक्षा केंद्र असताना आमचा क्रमांक का नाही, असा प्रश्न केंद्र अधिकाºयांना विद्यार्थ्यांनी केला. मात्र आमच्याकडे आलेल्या यादीनुसारच आसनक्रमांक लिहीण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अखेर परीक्षा विभागात त्यांनी संपर्क साधल्यानंतर संबंधित विद्यार्थ्यांसाठी एका वेगळ््या खोलीत पेपर लिहीण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे तेथील अधिकाºयांकडून सांगण्यात आले. त्यानुसार अखेर वेळेवर या विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र या गोंधळात विद्यार्थी तणावात आले होते. असा प्रकार शहरातील आणखी काही परीक्षा केंद्रांवरदेखील झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय हे परीक्षा केंद्र असलेल्या ६ ते ७ विद्यार्थिनींच्या परीक्षा ओळखपत्रावर ‘मिडीयम’ चुकीचे होते. त्यामुळे त्यांना परीक्षेला बसू देण्यास केंद्रप्रमुखांनी नकार दिला. अखेर विद्यापीठात संपर्क केला असता परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांनी त्या विद्यार्थिनींना पेपर सोडवू द्यावा, असे निर्देश केंद्रप्रमुखांना दिले.
पेपरच्या २ तासअगोदर मिळाले ओळखपत्र
दरम्यान, परीक्षेच्या पूर्वसंध्येपर्यंत अनेक विद्यार्थ्यांची ओळखपत्रेच ‘डाऊनलोड’ झाली नव्हती. तर बºयाच विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रांमध्ये चूका होत्या. वेळेवर परीक्षा अर्ज भरलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तर दुपारी १२ च्या सुमारास परीक्षा ओळखपत्रे देण्यात आली. तेथूनच विद्यार्थी थेट परीक्षा केंद्रावर गेले. त्यामुळे त्यांची बरीच धावपळ झाली.
गोंधळ कुठे झाला ?
परीक्षा ओळखपत्रात परीक्षा केंद्र नमूद असताना विद्यार्थ्यांचे आसनक्रमांक केंद्र अधिका-यांना का कळविण्यात आले नाही, असा प्रश्न उपस्थित झाला. यासंदर्भात परीक्षा विभागातील अधिकाºयांना विचारणा केली असता त्यांनी महाविद्यालयाच्या गोंधळामुळे हा प्रकार झाला असल्याचे सांगितले. महाविद्यालयांनी ऐन वेळेवर परीक्षा अर्ज भरले. त्यामुळे अगदी मंगळवारीदेखील अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा ओळखपत्र देण्यात आले. परंतु ‘आॅनलाईन’ प्रणालीत परीक्षा केंद्रावर परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था व त्यांचे क्रमांक अगोदरच पाठविण्यात येतात. परीक्षा केंद्रांनी त्यानुसार विद्यार्थ्यांच्या बसण्याची व्यवस्था केली होती. ऐन वेळेवर जारी झालेल्या परीक्षा ओळखपत्रांबाबत परीक्षा केंद्र अधिका-यांना माहिती नव्हती व त्यामुळे आसनक्रमांक यामुळे सूचनाफलकावर नव्हते, अशी माहिती सूत्रांनी दिली.