धापेवाडा यात्रेवरील बंधने शिथिल करण्यास मनाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 09:14 PM2020-06-30T21:14:09+5:302020-06-30T21:17:06+5:30
कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रतिपंढरपूर धापेवाडा येथे आयोजित देवशयनी आषाढी एकादशी यात्रा व आषाढी पौर्णिमा यात्रेवर लागू केलेली विविध बंधने शिथिल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नकार दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी प्रतिपंढरपूर धापेवाडा येथे आयोजित देवशयनी आषाढी एकादशी यात्रा व आषाढी पौर्णिमा यात्रेवर लागू केलेली विविध बंधने शिथिल करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी नकार दिला. बंधने शिथिल करण्यासाठी धापेवाडा येथील स्वयंभू श्री विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानने रिट याचिका दाखल केली होती.
प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. देवस्थानतर्फे १ जुलै रोजी देवशयनी एकादशी यात्रा आणि ५ व ६ जुलै रोजी आषाढी पौर्णिमा यात्रा आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी २७ जून रोजी आदेश जारी करून धापेवाडा येथे दिंडी व पालखी घेऊन येण्यास, मंदिर, मंदिर परिसरात व गावामध्ये सवाद्य मिरवणूक काढण्यास, सत्कार समारंभ, धार्मिक सभा, भक्ती संगीत, मेळावे घेण्यास, यात्रा भरवण्यास, सामूहिक प्रार्थना व तीर्थवाटप करण्यास मनाई केली. त्यावर देवस्थानने आक्षेप घेतला होता. ओडिशातील जगन्नाथ यात्रेच्या धर्तीवर धापेवाडा यात्रेवरील बंधने शिथिल करण्यात यावी, अशी देवस्थानची मागणी होती. परंतु, उच्च न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यासोबतच देवस्थानला यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याची मुभा दिली. देवस्थानने त्यांचे मुद्दे मांडल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर विचार करून योग्य तो आदेश जारी करावा, असे उच्च न्यायालयाच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. परिणामी, देवस्थानला अल्प दिलासा मिळाला.