जोरदार नारेबाजी : सायंकाळपर्यंत आंदोलन होते सुरूनागपूर : आपल्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी करून शिवणगावच्या प्रकल्पग्रस्तांनी आज मिहानच्या सेंट्रल फॅसिलिटी इमारतीचा ताबा घेतला. प्रकल्पग्रस्तांच्या आक्रमक भूमिकेनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रकल्पग्रस्तांना २८ किंवा २९ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.शिवणगाव प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मंगळवारी दुपारी सुरू झाले. ते वेगवेगळ्या समूहाने मिहानच्या इमारतीत दाखल झाले. त्यांनी आंदोलनाची पूर्वसूचना दिलेली नव्हती. जवळपास १ हजार प्रकल्पग्रस्त इमारत परिसरात गोळा झाले. यात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचा समावेश होता. इमारतीच्या सभागृहात शिरून प्रकल्पग्रस्तांनी मिहानच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अधिकारी अनेक प्रकरणात उत्तर देण्यास असमर्थ ठरले. आंदोलनकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून उपजिल्हाधिकारी व पुनर्वसन अधिकारी चौधरी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या आंदोलनाची माहिती दिली. दरम्यान पोलिसांना पाचारण करण्यात आले. आंदोलनकर्ते बाबा डवरे यांनी सांगितले की, प्रकल्पग्रस्त आपल्या समस्यांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी करीत आहेत. परंतु त्यांची सातत्याने उपेक्षा होत आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत त्वरित निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. तर गावकऱ्यांना देशोधडीला लावून मिहान प्रकल्प साकारण्यात येत असल्याचा आरोप रवि गुडधे, समीर मानकर, चंद्रशेखर बरडे, कुमार खोब्रागडे यांनी केला. (प्रतिनिधी)
प्रकल्पग्रस्तांनी घेतला मिहानच्या इमारतीचा ताबा
By admin | Published: December 23, 2015 3:44 AM