हेरिटेज कन्झर्व्हेशन सर्व्हिसेस प्रयोगशाळेला भेट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नामशेष होत असलेल्या अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक वास्तूशिल्पांचे संवर्धन करुन जतन करण्याचा हेरिटेज् कन्झर्व्हेशन सोसायटीच्या प्रकल्पामुळे समृद्ध अशा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा कायमस्वरुपी बघायला मिळणार आहे. ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचा हा पहिलाच प्रकल्प असल्याची भावना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी व्यक्त केली.
सेमिनरी हिल्स येथे हेरिटेज कन्झर्व्हेशन सोसायटीच्या माध्यमातून वन्य जीवांच्या (ट्रॉफिज) मृगया चिन्हांचे संरक्षण लिना झिल्पे-हाते हा प्रकल्प राबवत आहेत. ऐतिहासिक वास्तू संवर्धन प्रकल्पाला विभागीय आयुक्तांनी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
वन्य जीवांच्या (ट्रॉफिज)चे संरक्षण वैज्ञानिक पद्धतीने कसे होत आहे हे यावेळी विभागीय आयुक्तांनी जाणून घेतले. भारतातील प्रथम असलेल्या या प्रयोगशाळेच्या संचालिका लिना झिल्पे-हाते यांनी मृगया चिन्हांच्या ट्रॉफिजसोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कपडे व वस्तूंचे संरक्षण व संवर्धन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे संरक्षण व संवर्धन केल्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जतन करणे शक्य झाले आहे. हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीतील विद्यार्थ्यांना समजावा या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याची भावना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.
वन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील प्रयोगशाळेत वाघासह विविध प्राण्यांचे मृगया चिन्हांच्या संरक्षणाचे काम येथे सुरू असून शास्त्रोक्त पद्धतीने सुरू असलेल्या या कामाबद्दल लिना झिल्पे-हाते यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी निवृत्त महासंचालक एनआरएलसी डॉ. बी. व्ही. खरबडे उपस्थित होते.