लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेचे डीसीपी (पोलीस उपायुक्त) नीलेश भरणे यांची अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम २२ (न) च्या तरतुदीनुसार सक्षम प्राधिकारी यांच्या पूर्व मान्यतेने भारतीय पोलीस सेवेतील पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या खाली नमूद केलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती शासनाने केली. बुधवारी यासंबंधीचे आदेश जारी करण्यात आले. यात नीलेश भरणे यांच्यासह राज्यातील नऊ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.भरणे हे भारतीय पोलीस सेवेच्या २०१० च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते उत्तराखंड कॅडरचे आहेत. त्यांना प्रतिनियुक्तीवर मे २०१७ मध्ये नागपूरमध्ये नियुक्त करण्यात आले. सुरुवातीला डीसीपी विशेष शाखेचा पदभार सांभाळला. तिथे पासपोर्ट विभागाला नवीन रुप दिले. यानंतर झोन चारचे डीसीपी म्हणून काम केले. तेथून वाहतूक शाखेत पाठवण्यात आले. तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्याकडे गुन्हे शाखेची जबाबदरी सोपवण्यात आली होती. भरणे यांनी उत्तराखंड येथे असतांना केदारनाथ आपत्तीमध्ये बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.