कुही : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी १ जानेवारी २०२० रोजीची तात्पुरती सेवा जेष्ठता यादी १६ जून रोजी जाहीर केली. सदर यादीमध्ये चुकीच्या नोंदी आहेत. संपूर्ण यादी चुकीची असल्याचा आक्षेप महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेत्तर सेनेच्या जिल्हा शाखेने मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केला आहे.
तात्पुरत्या सेवा जेष्ठता यादीवर आक्षेप नोंदविण्यासाठी शिक्षकांना पुरेशी संधी देण्यात आली नाही. यादीतील नोंदी चूक किंवा बरोबर असल्याची खात्री करण्यासाठी संबंधित शिक्षकांच्या स्वाक्षरी घेण्यासाठी सेवा जेष्ठता यादीची प्रत पुरविण्यात आलेली नाही. सदर यादी जि.प. सेवेत प्रथम नियुक्ती दिनांकाच्या सेवा जेष्ठता नुसार जाहीर करून यादीवर आक्षेप मागविणे आवश्यक असताना विषय शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख पदावर रुजू झाल्याच्या दिनांकानुसार जाहीर करण्यात आल्याचा आरोप मनसे शिक्षक सेनेचे जिल्हा अध्यक्ष शरद भांडारकर व सचिव मनोज घोडके यांनी केला आहे.
१ जानेवारी २०२० च्या तात्पुरत्या सेवा जेष्ठता यादीमधील चुका दुरुस्त करण्यासाठी संबंधित शिक्षकांना संधी देऊन अंतिम यादी जाहीर केल्यानंतर पदोन्नतीची प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी संजय चामट, मोरेश्वर तडसे, नंदकिशोर उजवणे, श्रीराम वाघे, हरिश्चंद्र दहाघाणे, अरविंद आसरे, दीपचंद पेंडकांडे, चंद्रकांत मासुरकर, सुनील नासरे, नरेश धकाते, प्रदीप दुरगकर, हरिभाऊ बारापात्रे, राजेंद्र जनई, अशोक डहाके,वामन सोमकुवर, विनोद कुमरे, ललीता रेवतकर, संगीता अवसरे, कांचन मेश्राम, अनिता भिवगडे आदींनी केली आहे.