नागपूर :- केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा केली. यासोबतच देशभराम आदर्श आचारसंहितेची अंमलबजाणी सुरू झाली. नागपूर जिल्ह्यात व विभागात १९ एप्रिल व पश्चिम विदर्भात २६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. मात्र त्यानंतरही जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता कायम असल्याने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या शेकडो पदोन्नती रखडल्या आहेत. आचारसंहितेमुळे ज्या संवर्गच्या पदोन्नती रखडल्या आहेत त्यामध्ये सहायक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक, ग्राम विकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत, शिक्षण, कृषि, आरोग्य), कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, समाज कल्याण निरीक्षक, सहायक पशुधन विकास अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहायक, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक, सहायक व कनिष्ठ लेखा अधिकारी आदी पदांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली होती. या पदांची लेखी परीक्षा देखील झाली होती त्याचे निकाल व अंतिम निवड यादी देखील प्रसिद्ध करण्यात आली होती मात्र त्यापैकी अनेक संवर्गातील नियुक्ती आदेश आचारसंहितेमुळे जारी करण्यात आले नाही. तरी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान संपन्न झाल्यामुळे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या सेवा विषयक बाबी निकाली काढण्यासाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ सोहन चवरे, नरेंद्र धनविजय, परसराम गोंडाणे, प्रबोध धोंगडे, अनिल पवार, निरंजन पाटील, अब्दुल गफार आदींनी केली आहे.
आचारसंहितेच्या फेऱ्यात अडकल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या, नवीन नियुक्त्यांनाही फटका
By गणेश हुड | Published: May 11, 2024 7:44 PM