लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वंजारीनगर येथील प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे हत्याकांडात पाेलिसांनी मुख्य सूत्रधार म्हणून अटक केलेल्या मृतकाची पत्नी सीमा हिचे एका पोलीस अधिकाऱ्याशी मधुर संबंध असल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. त्यामुळे हत्याकांडाशी त्याचा काही संबंध आहे का, त्याची ग्रामीण पोलीस चाैकशी करणार आहेत.
पवन चाैधरीने त्याच्या अल्पवयीन साथीदाराला सोबत घेऊन वंजारीनगरातील निवासी प्राॅपर्टी डीलर प्रदीप बागडे यांचे अपहरण करून त्याची हत्या केली. मंगळवारी सकाळी खापा येथे बागडेचा मृतदेह मिळाल्यानंतर हे प्रकरण उघड झाले. यानंतर हुडकेश्वर पाेलिसांनी पवन चाैधरी तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला अटक केली. त्यांच्या चाैकशीतून बागडेच्या पत्नीनेच पतीच्या हत्येसाठी ३ लाख रुपयांची सुपारी दिल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी बुधवारी दुपारी सीमाला अटक केली. तिचा २८ पर्यंत पीसीआरही मिळवला.
दरम्यानच्या तिच्या चाैकशीतून पुन्हा नव्याने खळबळजनक माहिती पुढे आली आहे. त्यानुसार, नेतागिरीची सवय असलेल्या सीमासोबत एका पोलीस अधिकाऱ्याचे मधुर संबंध होते. या दोघांची सलगी प्रदीपलाच नव्हे तर त्या पोलीस निरीक्षकाच्याही घरी माहिती पडल्याने वादळ उठले. या वादळामुळेच निरीक्षकाची पत्नी मुंबईहून थेट वाठोड्यात पोहोचली होती. तेव्हा तो वाद शमला. परंतु आता सीमाने प्रदीपची हत्या करवून घेतली. त्यामुळे या सुपारी कांडात सीमासोबत त्या पोलीस निरीक्षकाच्या संबंधाची बाब पुन्हा एकदा चर्चेला आली आहे. या पार्श्वभूमीवर, त्या निरीक्षकाची काही भूमिका आहे का, त्याची चाैकशी केली जाणार आहे.
अजनीत असताना सलगी
काही दिवसांसाठी सदर निरीक्षक अजनी ठाण्यात होते. त्यावेळी सीमाचे त्याच्याशी संबंध आले आणि दोघांमधील सलगी वाढल्याचे बोलले जाते. सध्या हा अधिकारी नागपूर बाहेर बदलून गेला आहे.
----