हैदराबादच्या बंटी-बबलीचे पलायन : तहसीलमध्ये गुन्हा दाखल नागपूर : कथित कंपनीचा आॅनलाईन विस्तार दाखवून बंटी-बबलीने नागपुरातील एका प्रॉपर्टी डीलरला ४७ लाखांचा गंडा घातला. अहमद सोहेल अहमद अब्दुल जब्बार (वय ३८) आणि सिशा सोहेल (वय ३५) असे या ठगबाज जोडगोळीचे नाव आहे. ते हैदराबाद येथील गौरीनगर कॉलनीत राहतात. मोहम्मद हाजी अनिस सत्तार (वय ३८ रा. सेंट्रल एव्हेन्यू चंद्रलोक बिल्डिंग) बिल्डर यांची दोन वर्षांपूर्वी एका मालमत्तेच्या सौद्यातून सोहेल आणि सिशासोबत ओळख झाली. संबंध घनिष्ट झाल्यानंतर मोहम्मद हाजी यांनी बंटी-बबलीला जाफरनगरात आणि त्यानंतर अन्य एका ठिकाणी पॉश घर पाहून दिले. बंटी-बबलीने हाजी यांचा विश्वास संपादन करून आपल्या कंपनीचे सर्वत्र मोठे नेटवर्क असल्याचे सांगितले. लॅपटॉपवर कंपनीची आॅनलाईन माहिती आणि विस्तारही दाखवला. त्यानंतर आपल्या कंपनीत रक्कम गुंतवल्यास अल्पावधीत मोठा लाभ मिळेल, असे सांगितले. विश्वास बसल्यामुळे हाजी यांनी आॅगस्ट २०१४ ते जुलै २०१६ या कालावधीत बंटी-बबलीकडे टप्प्याटप्प्याने ४७ लाख रुपये गुंतवले. हाजी यांना संशय येऊ नये म्हणून बंटी-बबली नेहमीच त्यांना कुठे किती लाभ मिळाला आणि कुठे किती फायदा झाला, त्याचीही आॅनलाईन आकडेवारी दाखवत होते. २ जुलैपासून बंटी-बबली बेपत्ता झाले. दोन महिने शोधाशोध करूनही त्यांचा पत्ता लागला नाही. त्यांचे मोबाईलसुद्धा बंद झाले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने मोहम्मद हाजी यांनी तहसील ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी.डी. कुलथे यांनी ठगबाज बंटी-बबलीविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बंटी-बबलीचा शोध घेतला जात आहे.
प्रॉपर्टी डीलरला ४७ लाखांचा गंडा
By admin | Published: September 11, 2016 2:02 AM