लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - आर्थिक कोंडी झाल्यामुळे निखिलेश सतीशचंद्र बुटे (वय ३५) नामक प्रॉपर्टी डीलरने गळफास लावून आत्महत्या केली. बुटे त्यांची पत्नी, दोन मुले तसेच आई आणि अविवाहित बहिणीसह त्रिमूर्तीनगरात राहत होते.
बुधवारी दुपारी २.३० च्या सुमारास ते त्यांच्या शयनकक्षात गेले तर त्यांची पत्नी आणि कुटंबीय घरच्या कामात गुंतले. दुपारी ४.१५ वाजता पत्नीने त्यांना आवाज दिला. प्रतिसाद मिळत नसल्याने आजूबाजूच्यांना गोळा केले. दार तोडून बघितले असता ते गळफास लावलेल्या अवस्थेत आढळले. माहिती कळाल्यानंतर प्रतापनगरच्या पोलीस उपिनरीक्षक एस. टी. चामले घटनास्थळी पोहचल्या. त्यांना निखिलेशच्या रूममध्ये सुसाईड नोट आढळली. कोरोनामुळे जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार फसल्याने त्यांची तीव्र आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे निखिलेशला नैराश्य आले होते. त्यावरून त्याने आत्महत्या केल्याचा अंदाज सुसाईड नोटच्या मजकुरावरून पोलिसांनी काढला. निखिलेशने त्याची आर्थिक कोंडी झाल्याची माहिती यापूर्वी त्याच्या मित्रांनाही दिली होती. आता सर्व सुरळीत होत असल्याने या कोंडीतून तू बाहेर पडशील, असे त्याचे मित्र त्याला सांगत होते. मात्र, वैफल्यग्रस्त झाल्यामुळे निखिलेशने हा आत्मघाती निर्णय घेतला.
कुटुंबं निराधार
निखिलेशला वृद्ध आई, अविवाहित बहीण, पत्नी आणि चार वर्षांची दोन जुळी मुले आहेत. या कुटुंबाचा तो आधार होता. त्यानेच स्वत:चा आत्मघात करून घेतल्याने त्याचे कुटुंब निराधार झाले आहे.