लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अतिक्रमण हटविण्याची सूचना करणाºया एका प्रॉपर्टी डिलरची गुन्हेगारी वृत्तीच्या दोघांनी निर्घृण हत्या केली. राजेश पुणाजी नंदेश्वर (वय ३५) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी १.३० च्या सुमारास झालेल्या या हत्याकांडामुळे जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रचंड थरार निर्माण झाला होता. सोनू शाहू आणि कल्लू यादव अशी आरोपींची नावे आहेत.सतीश जयराम वाघमारे यांचा रिंगरोडला लागून कामगारनगर चौकाजवळ २७०० चौरस फुटांचा भूखंड आहे.या भूखंडावर अतिक्रमण करून आरोपी सोनू शाहू आणि कालू यादव १५ वर्षांपासून पान आणि चहा टपरी चालवित होते. हा मोक्याचा भूखंड आपलाच आहे, अशा अविर्भावात ते वागत होते. वाघमारे यांनी तो भूखंड विकायला काढला होता. राजेश नंदेश्वर आणि सागर राऊत हे दोघे मित्र प्लॉट, फ्लॅट विक्रीचे आणि नासुप्रमध्ये मालमत्तेसंदर्भात अडले नडले कामे करून देण्याचेच काम करायचे. वाघमारेच्या भूखंडाचा त्यांनी शेख अब्दुल हक ऊर्फ पापाभाई यांच्यासोबत २७ लाखात सौदा पक्का केला होता. मात्र, अतिक्रमण हटविल्यानंतरच कमिशनची रक्कम मिळेल, अशी अट भूखंड विकणारे आणि विकत घेणाºयांनी टाकली होती. त्यामुळे राजेशने महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाला माहिती देऊन अतिक्रमण हटविण्यासंबंधीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक वाघमारेंच्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याचे काम करणार होते.कुटुंबीयांवर आघातप्रॉपर्टी डिलींगमध्ये भागीदार असलेला सागर हा दुपारी १ वाजतापासून राजेशला फोन करीत होता. मात्र, इकडे मारेकºयांनी त्याचा घात केल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. हत्येची माहिती मिळाल्यानंतर जरीपटका पोलीस तेथे पोहचले. त्यांनी राजेशचा फोन वाजत असल्याचे पाहून उचलला नंतर सागरला त्याच्या मित्राच्या हत्येची धक्कादायक माहिती कळाली. एवढेच नव्हे तर पोलिसांना मृत कोण आहे, कुठे राहतो, त्याची माहिती कळली. मृत राजेशला तीन वर्षांचा मुलगा आणि सात वर्षांची मुलगी आहे. पत्नीला हे वृत्त कळताच ती किंचाळतच घटनास्थळी धावली. त्याचे दोन लहानगे घरीच खेळत होते. आपले पितृछत्र हिरावले गेल्याची कसलीही कल्पना या निरागस जीवांना नव्हती. ऐन दिवसाळीच्या तोंडावर कटुुंबप्रमुख गेल्यामुळे नंदेश्वर कुटुंबीयांच्या भविष्यात काळोख पेरल्यासारखा झाला आहे. विशेष म्हणजे, दुपारी १ ते १.३० च्या सुमारास झालेल्या या हत्याकांडाची माहिती जरीपटका पोलिसांकडून पत्रकार तर सोडा पोलिसांच्या माहिती कक्षालाही रात्री ९.१५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली नव्हती. मृत किंवा आरोपींची नावे, घटनास्थळ, कारण, घटनेची वेळ अशी जुजबी माहितीही उपलब्ध करून देण्यात आली नव्हती.आरोपींचे साथीदार किती ?राजेशच्या हत्येचे कटकारस्थान आरोपींनी आधीच करून ठेवले असल्याचा संशय आहे. त्यांनी आपल्या टपरीत तलवार लपवून ठेवली होती, त्यातून हे स्पष्ट होते. अनेकांदेखत राजेशची हत्या केल्यानंतर आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले. त्यासाठी दोन दुचाक्या तयार होत्या. ऐन चौकाजवळ असलेला हा भूखंड प्रत्यक्षात ७० लाख ते १ कोटी रुपये किंमतीचा आहे. तो हातून जात असल्याचे पाहून आरोपींनी कट करूनच हे हत्याकांड घडविले असल्याच्या संशयाला बळकटी येते. या एकूणच प्रकारामुळे आरोपींसोबत आणखी काही साथीदार राजेशच्या हत्येच्या कटात सहभागी असावे, असाही संशय घेतला जात आहे. रात्रीपर्यंत या प्रकरणातील कोणताही आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता.
घाई गडबडीमुळे झाला घातपोलीस बंदोबस्तात शासकीय यंत्रणा अतिक्रमण हटविणार हे माहीत असूनही राजेशला घाई झाली होती. त्यामुळे अतिक्रमण पथक येण्यापूर्वीच सोनू आणि कल्लूने त्यांचे अतिक्रमण हटवावे, असे त्याला वाटत होते. त्यासाठी गुरुवारी सायंकाळी राजेश आणि त्याचा मित्र सागर हे दोघे भूखंडावर गेले होते. तेथे त्यांनी सोनू आणि कल्लूला भूखंड विक्रीची कल्पना देऊन तातडीने आपले अतिक्रमण हटविण्याविषयी सांगितले होते. शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास राजेश पुन्हा एकटाच सोनू आणि कल्लूच्या टपरीवर गेला. तुम्ही तातडीने आपले दुकान हटवा, आता काही वेळेतच अतिक्रमण हटाव पथक येणार आहे, असे त्याने सांगितले. त्यावरून सोनू आणि कल्लूने राजेशसोबत वाद घातला.