लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरहून थेट गोवा, जयपूरकरिता नवीन उड्डाणासाठी इंडिगो एअरलाईन्सने नागरी उड्डायण संचालनालयाकडे (डीजीसीए) प्रस्ताव पाठविला आहे. याशिवाय मुंबईकरिता नागपुरातून पाचवे नवीन उड्डाणाच्या संचालनासाठी कंपनीने प्राधिकरणाकडे प्रस्ताव ठेवला आहे.नागपूर आणि आसपासच्या शहरातून जयपूर आणि गोवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या पाहता कंपनीने प्रस्ताव सादर केला आहे. कंपनीने पूर्वी नागपुरातून जयपूरकरिता मुंबईमार्गे सेवा दिली होती, पण प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही सेवा बंद केली होती. गोवाकरिता थेट सेवा मिळावी म्हणून पर्यटकांची नेहमीच मागणी राहिली आहे.या संदर्भात मिहान इंडिया लिमिटेडचे वरिष्ठ विमानतळ संचालक विजय मुळेकर यांनी सांगितले की, कंपनीने प्रस्ताव पाठविला आहे. जयपूर येथे उड्डाणांची अधिकता असल्यामुळे कंपनीला स्लॉट उपलब्ध करून देणे शक्य आहे.गोवा येथे नेव्हीचे विमानतळ आहे. या ठिकाणी बहुतांश विदेशी पर्यटक एटीआर विमाने मोठ्या प्रमाणात येतात. डीजीसीए संपूर्ण पैलूंवर विचार करून मंजुरी देते. मुंबई विमानतळ व्यस्त आहे. याआधी इंडिगोने नागपुरातून मुंबईकरिता पहाटे ५.२० वाजता विमान उड्डाणासाठी डीजीसीएकडे प्रस्ताव पाठविला होता. तो मंजूर करण्यात आला आहे. मुंबईत दुसरी धावपट्टी असल्यामुळे कंपनीला स्लॉट मिळाला. अशा स्थितीत पुन्हा नवीन उड्डाणासाठी मान्यता मिळविण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
गरमीमुळे एटीआर विमानाचे उड्डाण रद्द इंडिगो एअरलाईन्सच्या नागपूर-हैदराबाद विमानाचे टायर गरमीमुळे तापल्यामुळे शनिवारी सायंकाळी ६ वाजता उड्डाण रद्द करावे लागले. कंपनीने प्रवाशांना सुविधा उपलब्ध करून देत लखनौ येथून दुसरे विमान मागवून हैदराबादला रवाना केले. इंडिगो एअरलाईन्स नागपूर ते हैदराबादकरिता ७२ सीटांच्या एटीआर विमानाचा उपयोग करीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाची चाके फ्युजेबल प्लग, थर्मल प्लग आणि बेरिंगमध्ये समस्या आल्यामुळे अत्यंत तापले होते. प्रवाशांची सुरक्षा ध्यानात ठेवून कंपनीने दुसºया विमानाची व्यवस्था केली. अभियंत्यांनी शनिवारी सायंकाळपर्यंत विमान दुरुस्त केले. त्यानंतर रविवारी हेच विमान हैदराबादला रवाना करण्यात आले.