नागपूर : हृदय पिळवटून टाकणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेतील हलगर्जीपणाच्या एक-एक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरिता १,५२, ४४, ७८३ इतक्या किमतीच्या अंदाजपत्रक प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. यामुळे आरोग्य सेवा संचालकांकडून प्रस्तावाला मंजुरीच मिळाली नाही. नंतर तो धूळखात पडून राहिल्याने अग्निशमन यंत्रणेची खरेदीच झाली नाही.
अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दहा बालकांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोग्य सेवा संचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात ही समिती सदर घटनेची कारणमीमांसा करून त्रुटी शोधून काढणार आहे. परंतु रुग्णालय स्थापन होऊन २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्याला कुणीच गंभीरतेने घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
या घटनेवर प्रकाश टाकणारे एक पत्र ‘लोकमत’चा हाती लागले. त्यानुसार, भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी आरोग्य विभागाचे संचालक डॉ. साधना तायडे यांना आग प्रतिबंधक उपाययोजनेचा अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. १५ सप्टेंबर २०२० रोजी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावात अग्निशमन यंत्रणा खरेदीसाठी १,५२, ४४, ७८३ इतक्या किंमतीची मागणी करण्यात आली होती. परंतु प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. यामुळे संचालक डॉ. तायडे यांनी प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वाक्षरी करून व सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिम सहमती घेऊन तो आयुक्त कार्यालयात सादर करावा, जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल असे पत्र, १३ नोव्हेंबर २०२० रोजी आरोग्य सेवा नागपूर मंडळचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना पाठविले. या पत्राचा आधार घेऊन डॉ. जयस्वाल यांनी २० नोव्हेंबर रोजी डॉ. खंडाते यांना अंदाजपत्रक त्रुटीची दुरुस्ती करून फेरसादर करण्याचा सूचना केल्या. परंतु नंतर हा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक कार्यालयात पोहचलाच नाही. यामुळे अग्निशमन यंत्रणेची खरेदीच होऊ शकली नाही. यंत्रणा उपलब्ध असती आणि ‘एसएनसीयू’ कक्षात डॉक्टर, परिचारिका व अटेन्डंट उपस्थित असते तर १० बालके आज जिवंत असती, असे बोलले जात आहे.