जितेंद्र ढवळे ल्ल नागपूरनागपूर : सततची नापिकी, दुबार पेरणी आणि दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. नागपूर जिल्ह्यात २०१६-२०१७ या वर्षांत राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाच्या निधीत चारपटीने वाढ करण्याचा निर्णय वन विभाग व जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. एकूण ७६ गावांची या अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. १२ कोटी १४ लाख ५५ हजार रुपयांची कामे यात प्रस्तावित करण्यात आली आहेत.२०१५-१६ या वर्षांत जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाला आलेले यश. ९६ गावांत करण्यात आलेले सलग समपातळी चर (सी.सी.टी), गॅबियन बंधारे, अनघड दगडी बांध, मातीचे बांध, सिमेंट प्लग, वन्यजीव पाणी साठवण तलाव आणि जलशोषक चराचा गाव शिवाराला निश्चितच फायदा झाला. या कामांसाठी ३ कोटी ६८ लाख ६२ हजार रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आला होता. निधी असला तरी स्थानिक शेतकरी, वन विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या कामासाठी संवादाचे ‘सलग सम पातळी चर’ उभारले. ते कोणत्याही विधायक कामासाठी आवश्यक असतात. काटोल वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव येथे १८ हजार १५० र.मी. (रुंदी मीटरमध्ये) करण्यात आलेले खोल सलग समपातळी चर (सीसीटी) भविष्यात या परिसरात पाण्याची पातळी वाढविण्यासाठी निश्चितच उपयोगी पडणार आहे. साधारणत: सीसीटीचे फायदे दोन वर्षांत दिसून येतात. याशिवाय माळेगांव व गंगालडोह येथे अनघड दगडी बांध बांधण्यात आले आहेत. त्याचा वनपरिक्षेत्रात पाणी जिरविण्यासाठी फायदा होतो आहे. याशिवाय हिंगणा वनपरिक्षेत्रात नालाखोलीकरणाचे ६. ५ किलोमीटरचे काम वास्तवात साकारण्यात वनविभागाला यश आले आहे, हे विशेष. २०१४-१५ या वर्षांत जिल्ह्यात केवळ १९ गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात आले होते. यावर १ कोटी ६४ लाख १३ हजार रुपयांचा खर्च झाला होता. १४ तालुके असलेल्या जिल्ह्यांसाठी हा निधी निश्चितच कमी ठरणारा होता. यात दोन वर्षांत १२ पट वाढ करण्यात आल्याने तब्बत ७६ गावांना याचा फायदा होणार आहे. गावातील पाणी गावांत, शेतातील पाणी शेतात मुरावे, हे जलयुक्त शिवार अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे. गत वर्षभरात झालेली कामे समाधानकारक आहेत. कोणतेही काम जनतेच्या सहकार्याशिवाय शक्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाला वेग दिला. त्यामुळे गावांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे निधीही वाढविण्यात आला. पाच वर्षांत नागपूर जिल्हा जलयुक्त शिवाराचे रोल मॉडेल असेल. चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री, नागपूर जिल्हा
जलयुक्त शिवार अभियानाला समृद्धी
By admin | Published: February 19, 2016 3:13 AM