नागपूर : महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर डिसेंबरपासून वाहतूक सुरू होईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु हा मुहूर्त हुकला. कारण अजूनही अनेक कामे शिल्लक आहेत. दुसरीकडे हा प्रकल्प पूर्ण करणाऱ्या एमएसआरडीसीने यासंदर्भात कुठलीही नवीन डेडलाईन निश्चित केलेली नाही. परंतु शिल्लक असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर यांना जोडणारा ७०१ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे. यातील ३१ किमीचा मार्ग हा नागपूर जिल्ह्यात येतो. मुख्य समस्या येथेच आहे. शेजारी वर्धा जिल्ह्यातील ९८ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर नागपुरात ऑक्टोबरपर्यंत केवळ ६२ टक्के काम पूर्ण झाले होते. आता तर किती काम शिल्लक आहे हे अधिकारीसुद्धा सांगत नाहीत. ते केवळ फिनिशिंग टच देणे शिल्लक राहिले आहे, इतकेच सांगतात. परंतु वस्तुस्थिती वेगळीच आहे. वर्धा रोडवरील उड्डाणपूल अजूनही पूर्ण झालेला नाही.
टोलसाठी निविदा जारी
दरम्यान, एमएसआरडीसीने टोल वसुलीसाठी निविदा प्रक्रिया जारी केली आहे. जवळपास ३१ ठिकाणी टोल नाके तयार करण्याची योजना आहे. नागपुरातील शिवमडका जेथून हा महामार्ग सुरू होतो, तो वगळून कुठेही महामार्गावर टोल नाके राहणार नाहीत. टोल नाके लिंक रोडवरच असतील. दुसरीकडे सूत्रांचा असा दावा आहे की, नागपूरवरून मुंबईला जाण्यासाठी या महामार्गावर जवळपास ११६० रुपयांचा टोल वसूल केला जाईल. ५५ हजार कोटी रुपयांची वसुली होईपर्यंत ही टोल वसुली सुरू राहील.