नागपूर : अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गंगा जमुनातील वारांगणांच्या देह विक्रयावर पोलिसांनी घातलेली बंदी आज स्वातंत्र्यदिनी आंदोलकांनी उलथवून टाकली. वेश्यावस्तीला पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स उलथवून तेथील टीनाही फेकून दिल्या. विदर्भातील सर्वात मोठी वेश्यांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगाजमुनात वेश्याव्यवसाय बंद करण्यासाठी पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चार दिवसांपूर्वी या वस्तीच्या आजूबाजूचे रस्ते पोलिसांनी बेरीकेट लावून बंद केले.
काही ठिकाणी टीनाही उभ्या केल्या. या वस्तीसाठी पोलिसांनी विशेषाधिकाराचा वापर करून कलम १४४ लागू केले. येथे येणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. या कारवाईचा येथील वारांगना सोबतच काही सामाजिक संघटनांनीही तीव्र विरोध केला आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक महिला नेत्या ज्वाला धोटे यांनी या कारवाईचा पहिल्या दिवसांपासूनच तीव्र विरोध चालवला आहे. वारांगणाचे आधी पुनर्वसन करा आणि नंतर त्यांना येथून हुसकावून लावा, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यांच्या जगण्याचा अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार कुणालाही नसल्याचेही म्हटले होते. पोलिसांनी १४ ऑगस्टपर्यंत येथील बॅरिकेट्स काढले नाही तर १५ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला होता. त्यानुसार पोलिसांनी रविवारी सकाळपासूनच येथे मोठा बंदोबस्त लावला. मोठ्या प्रमाणात महिला पोलिसही नेमले होते. त्याला न जुमानता ज्वाला धोटे आपल्या कार्यकर्त्यांसह येथे पोहोचल्या. त्यांनी वारांगनाना एकत्रित करून कार्यकर्त्याच्या मदतीने पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स हटविले. टीनाही काढून टाकल्या. या घडामोडीमुळे गंगा जमुना परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच पोलीस उपायुक्त लोहित मतानी आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जमावाची समजूत काढली. त्यानंतर वातावरण निवळले.
कलम १८८ अन्वये गुन्हा दाखललकडगंज पोलिसांनी या प्रकरणात रविवारी सायंकाळी आंदोलकांवर साथरोग प्रतिबंधक कायद्याचे कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला.