नागपूर : महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असलेल्या आरोपीला अटक करून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने दोन महिलांची सुटका केली आहे. ही कारवाई शुक्रवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास फुले मार्केटमध्ये करण्यात आली.
जय महादेव जोशी (४२, रा. प्लॉट नं. २१, रामकृष्णनगर, उमरेड रोड, दिघोरी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी जयचे गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत फुले मार्केटमध्ये जोशी ट्रेडर्स नावाचे ४४ व ४५ क्रमांकाचे शॉप आहे. आरोपीने आपल्या फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमीष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेणे सुरु केले होते. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला याची माहिती मिळताच शुक्रवारी दुपारी आरोपी जयच्या शॉपमध्ये धाड टाकण्यात आली. तेथे आरोपी आपल्या फायद्यासाठी पिडीत महिलांकडून देहव्यापार करवून घेताना आढळला.
आरोपीच्या ताब्यातून दोन महिलांची सुटका करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईल, रोख १५ हजार ५०० रुपये व इतर साहित्य असा एकुण २५ हजार ६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गणेशपेठ पोलिस ठाण्यात कलम ३७०, सहकलम ४, ५, ७ पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपीला गणेशपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने केली.