लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुली व महिलांना पैशांचे आमीष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेणाऱ्या धंतोलीतील मेहाडिया चौकातील टु रिलॅक्स फॅमिली सलून अँड स्पाच्या आरोपी संचालक महिलेस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने गजाआड करून पाच पिडीत महिला व मुलींची सुटका केली आहे.
प्रेमलता उर्फ प्रिती उर्फ डॉली सुभाष चिंचुलकर (३८, रा. मानवसेवानगर, व्हेटरनरी कॉलेजजवळ गिट्टीखदान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. ती धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मेहाडिया चौकात घर नं. ५९७, दुसरा माळा येथे टु रिलॅक्स फॅमिली सलून अँड स्पा सेंटरच्या आड देहव्यापाराचा अड्डा चालवित होती. आरोपी महिला आपल्या आर्थिक फायद्यासाठी महिला व मुलींना पैशांचे आमीष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत होती. तसेच आपल्या सलून अँड स्पा म ध्ये देहव्यापारासाठी जागा उपलब्ध करून देत होती. याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला समजली. विभागाच्या निरीक्षक कविता इसारकर, सचिन बढीये, अजय पौनीकर, शेषराव राऊत, समीर शेख, अश्वीन मांगे, नितीन वासने, कुणाल मसराम यांनी टु रिलॅक्स फॅमिली सलून अँड स्पा सेंटरमध्ये धाड टाकली. तेथे आरोपी महिला पाच पिडीत महिला, मुलींकडून देहव्यापार करवून घेताना आढळली. तिच्या विरुद्ध कलम ४, ५, ७ पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीच्या ताब्यातून एक मोबाईल, रोख ३५०० रुपये आणि इतर साहित्य असा १८ हजार ५५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच पिडीत महिला-मुलींची सुटका करण्यात आली.