नागपूर : धापेवाडा - पाटणसावंगी मार्गावर सावनेर नजिक असलेल्या माही लॉजवर वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे कळताच पोलिसांनी तेथे छापा घातला. यावेळी तेथे पोलिसांना तेथे दोन सेक्स वर्कर आणि ६ रंगेल ग्राहकांसह एकूण १० जण हाती लागले. गुरुवारी सायंकाळी नागपूर ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
पवित्र तिर्थस्थान म्हणून परिचित असलेल्या धापेवाड्याला भाविकांची वर्षभर वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात पर्यटकही तिकडे फिरायला जातात. या पर्यटकांमध्ये काही आंबट शाैकिनांचाही समावेश असतो. नागपूर शहरापासून दूर असलेल्या या भागात कारवाईचा धाक नसल्याने मोठ्या प्रमाणावर या भागात लॉज, हॉटेल्स उघडले गेले आहेत. या हॉटेल्स लॉजच्या मालकांपैकी बहुतांश जण कोणताही विधिनिषेध न बाळगता आंबट शाैकिन ग्राहकांना अनैतिक कृत्यासाठी रूम उपलब्ध करून देतात.
कोणतीही रोकटोक नसल्याने अशा हॉटेल्स, लॉजमध्ये 'तरुण-तरुणींची', ग्राहकांचीही मोठी वर्दळ असते. अलिकडे काही हॉटेल्स आणि लॉजच्या मालक, व्यवस्थापकांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणी आणि महिलांशी संगणमत करून त्यांच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय सुरू केल्याची माहिती आहे. धापेवाडा शिवारातील माही लॉजमध्येही असाच प्रकार सुरू असल्याचे कळाल्यामुळे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनाखाली परिक्षाविधिन उपअधीक्षक राहुल झालटे, उपअधीक्षक राजेंद्र निकम यांनी कारवाईचा सापळा लावला. त्यानुसार, पंटरला गुरुवारी सायंकाळी माही लाजमध्ये पाठविण्यात आले. लॉज मालक सुशिल गजभिये आणि व्यवस्थापक विनोद खुरपुडे सोबत बोलणी करून पंटरने वेश्यांची मागणी केली. एका सेक्स वर्करचे १ हजार रुपये प्रमाणे पंटरकडून रक्कम घेतल्यानंतर आरोपींनी त्यांना दोन वारांगणा उपलब्ध करून दिल्या.
त्या रुममध्ये जाताच पोलिसांनी तेथे छापा घातला. यावेळी त्या दोन सेक्स वर्कर, लॉज मालक सुशिल नारायण गजभिये (वय ३२, रा. वाघोडा, सावनेर), व्यवस्थापक विनोद जनार्धन खुरपडे (वय ३०, सावनेर) यांच्यासोबतच तेथे प्रतिक्षेत असलेले महेश निंबाळकर (वय २६, रा. ब्राम्हणी), अक्षय मेश्राम (वय २४, रा. कळमेश्वर), राकेश चाैधरी (वय २८, रा. नईमा, जि. नालंदा, बिहार), धिरज पाटील (वय २९, रा. येरजा), मनीष वाघमारे (वय २७, रा. कळमेश्वर) आणि अनूप धोटे (वय २४, रा. कोंढा) यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ निर्माण झाली. अनेक वारांगणा आणि ग्राहकांनी बाहेरच्या बाहेरूनच पळ काढला.
तीन दिवसांचा पीसीआर
या प्रकरणी एपीआय अजाब नेवारे यांच्या तक्रारीवरून सावनेर पोलीस ठाण्यात उपरोक्त आरोपींविरुद्ध पिटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.तपास अधिकारी शिवाजी नागवे यांनी आज आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांचा ११ सप्टेंबरपर्यंत पीसीआर मिळवला. या कारवाईत हवलदार ज्योती लोखंडे, नायक सारिका इंदूरकर, अंमलदार कांचन चंदनखेडे, प्रफुल्ल भातुलकर आणि राहुल गडिलंग यांचाही समावेश होता.