नागपूर : वर्धा मार्गावरील स्वामी विवेकानंद चौकातील एका हेअर सलूनच्या आड देहव्यापाराचा अड्डा सुरू होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने धाड टाकून याचा भंडाफोड केला व दोन आरोपींना अटक केली. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीची तेथून सुटका केली. धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला.
स्वामी विवेकानंद चौकात हेअर डायविंग युनिसेक्स सलून आहे. तेथे देहव्यापार सुरू असल्याची गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली. तेथे मुलींना ग्राहक व जागा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचीदेखील टीप मिळाली होती. पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी सापळा रचला व डमी ग्राहकाच्या माध्यमातून या बाबीची चाचपणी केली. तेथे धाड टाकली असता दीपक मदन कटवते (३६, फोर्थ क्लास बिल्डींग, सिव्हील लाईन्स, आमदार निवास) व प्रवीण रामभाऊ कान्होलकर (४६, बोरगाव मार्ग, गोरेवाडा) हे आरोपी तेथे आढळले. ते गरीब मुलींना आर्थिक आमिष दाखवून जाळ्यात ओढायचे व त्यांना देहव्यापारासाठी ग्राहक तसेच जागा उपलब्ध करवून द्यायचे.
घटनास्थळी पोलिसांना एक अल्पवयीन मुलगीदेखील आढळली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात पिटा तसेच पोक्सो कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपींचे मोबाईल जप्त करत त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, राजेंद्र गुप्ता, बबन राऊत, हेमंत लोणारे, मनोज टेकाम, शरद चांभारे, सुशांत सोळंके यांच्या पथकाने ही कारवाई केली.