नागपूर : देहव्यवसायाला व्यवसाय म्हणून मान्यता मिळावी, या अमृता फडणवीस यांच्या वक्तव्याचे शहरातील सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी समर्थन केले आहे.
सर्वाेच्च न्यायालयानेही याबाबतचा निर्णय नुकताच १९ मे राेजी दिला हाेता. मात्र, अमृताताईंनी बाेलण्यास उशीर केला, असे म्हणत गेल्या १० महिन्यांपासून नागपूरच्या गंगाजमुनातील महिलांवर अत्याचार हाेत असताना त्या गप्प का राहिल्या, असा सवालही महिलांनी केला. देहव्यवसाय करणाऱ्या महिलांना परवाना देण्यासह सर्व आराेग्यविषयक, शासकीय सुविधा देण्याबाबत शासनाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले आहे.
अमृता यांच्या बाेलण्यात काय चुकीचे? : ज्वाला धाेटे
आपण देहव्यवसायाचे समर्थन करीत नाही, कुणीही महिला व्यवसायात येऊ नये, असेच मी म्हणेन. मात्र, ज्या महिला परिस्थितीमुळे, मुलांच्या, कुटुंबाच्या जबाबदारीने या व्यवसायात आहेत, त्यांच्यावर अन्याय हाेऊ नये. त्यांना सुरक्षेचे वातावरण मिळाले पाहिजे. दारू, सिगारेट, तंबाखू विकायला परवानगी मिळते, तर देहव्यवसाय करणाऱ्यांना का नाही? व्यवसाय म्हणून मान्यता मिळाली, तर त्यांना अधिकार मिळेल. सर्वाेच्च न्यायालयाने यापूर्वीच आपल्या निर्णयात या महिलांच्या सन्मानाचे आवाहन केले हाेते. त्यामुळे अमृताताई यांच्या वक्तव्याचेही समर्थन करते. त्यांना ट्राेल करणाऱ्यांनी स्वत:ची लाज बाळगावी.
-ज्वाला धाेटे, गंगा जमुना बचाव आंदाेलनाच्या नेत्या
अल्पवयीन मुली व या महिलांच्या हक्काविषयी बाेला : स्मिता सिंगलकर
सर्वाेच्च न्यायालयाने याविषयी भाष्य केले आहे, अमृता फडणवीस यांच्या बाेलण्यात नवीन काही नाही. मात्र, यात ओढल्या जाणाऱ्या अल्पवयीन मुली व अनधिकृत छुप्या व्यवसायाविषयीसुद्धा बाेलायला हवे. स्वत:हून कुणी हे प्राेफेशन स्वीकारत नाही, त्यांना जबरदस्तीने आणले जाते. या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळावी; पण देशातील आहे त्या परिस्थितीत नव्हे. त्यांना परवाने मिळावेत, तशी यंत्रणा निर्माण व्हावी, त्यांच्या आराेग्यासह सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात. मात्र, ती शक्यता दिसत नाही. त्यापेक्षा मुलींना शिक्षणाच्या संधी, गरिबी निर्मूलन व महिलांना सन्मानाने जगता येईल, अशी व्यवस्था निर्माण करावी, जेणेकरून कुणी या व्यवसायात येणारच नाही.
-ॲड. स्मिता सिंगलकर, सामाजिक कार्यकर्त्या
निरर्थक चर्चेतून काय हशील : रूपाताई कुळकर्णी
वेश्या व्यवसायाला समाजाकडून अघाेषित मान्यता आहेच. त्यामुळे इतक्या वर्षांपासून ताे सुरू आहे. अगदी पुरातन काळातही वेगळ्या रूपात ते स्वीकृत हाेते. अप्सरा, गणिका, अशी असंख्य उदाहरणे प्राचीन ग्रंथात मिळतात. त्यामुळे अनादिकाळापासून समाजमान्यता, लाेकमान्यता या व्यवसायाला आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे बंदी आणली तरी ते बंद हाेणार नाही. मात्र, अमृता फडणवीस यांनी यावर भाष्य करावे, याचे आश्चर्य वाटते. कदाचित चर्चा घडविण्यासाठी त्या बाेलल्या असतील. या महिलांसाठी काम करायचे नाही आणि निष्फळ चर्चा घडविल्याने काय साध्य हाेईल?
-रूपाताई कुळकर्णी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या