पारशिवनी (नागपूर) : देहव्यापार चालणाऱ्या पारशिवनी शहरातील पारशिवनी-इटगाव मार्गावरील काकडे फॅमिली रेस्टाॅरंट, बार ॲण्ड लॉजिंगवर नागपूर ग्रामीण पाेलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष पथकाने मंगळवारी (दि. २३) सायंकाळी धाड टाकली. यात लाॅज मालक व देहव्यापारासाठी वापरल्या जाणाऱ्या सात तरुणींना अटक केली. या कारवाईत ६,६०० रुपये राेख व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती पाेलीस उपनिरीक्षक मीरा मटाले यांनी दिली.
या कारवाईत लाॅज मालक रामू उर्फ रामदास गुंडेराव काकडे (५१, रा. प्रभाग-६, पारशिवनी) याच्यासह सात तरुणींना अटक करण्यात आली. काकडे फॅमिली रेस्टाॅरंट, बार ॲण्ड लॉजिंगमध्ये देहव्यापार चालत असून, त्यासाठी तरुणींना बाहेरून बाेलावले जात असल्याची माहिती नागपूर ग्रामीण पाेलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील अधिकाऱ्यांना मिळाली हाेती. त्यामुळे या कक्षातील पथकाने मंगळवारी सायंकाळी त्या लाॅजमध्ये बनावट ग्राहक पाठवून चाचपणी केली. आत देहव्यापार चालत असल्याची माहिती त्या ग्राहकाने देताच पथकाने धाड टाकली. यात त्यांनी लाॅज मालकासह सात तरुणींना अटक केली.
त्यांच्याकडून एकूण ६,६०० रुपये राेख व इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी पारशिवनी पाेलिसांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा २५२/२०२२ कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या घटनेचा तपास रामटेकचे ठाणेदार प्रमाेद मकेश्वर करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक मीरा मटाले यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.
१,५०० रुपयात साैदा
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील बनावट ग्राहकाने लाॅजमध्ये जाऊन १,५०० रुपयात साैदा केला. लाॅज मालकाने रक्कम स्वीकारताच धाड टाकण्यात आली. अटक करण्यात आलेल्या तरुणी या १९ ते ३२ वर्षे वयाेगटातील आहेत. त्यांना पारशिवनी येथील प्रथम श्रेणी न्यायालयाच्या आदेशान्वये नागपूर शहरातील महिला सुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
इतर लाॅजमध्ये चालताे देहव्यापार
पारशिवनी तालुक्यातील कन्हान-मनसर, पारशिवनी-खापरखेडा, रामटेक-सावनेर, कन्हान-तारसा, आमडी फाटा-नागपूर (राष्ट्रीय महामार्ग), पारशिवनी-चारगाव या मार्गांवर लाॅजची संख्या अलीकडच्या काळात बरीच वाढली आहे. यातील बहुतांश लाॅजवर खुलेआम देहव्यापार केला जात असून, तरुणी-तरुणींना शरीर संबंधांसाठी सहज रूम उपलब्ध करून दिल्या जातात. यात शाळा-महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा समावेश आहे.