नागपूर : सत्ता पक्षाने सभागृहात 'एयु'च्या घोषणा देऊन आदित्य ठाकरे यांच्या चरित्राचे हनन केले आहे. तर, दुसरीकडे खासदार शेवाळे यांच्याचविरोधात साकीनाका पोलीस ठाण्यात एका महिलेने अत्याचार केल्याची तक्रार केली आहे. तिला भारताबाहेर जावं लागलं आहे. ती मुंबई पोलीस आयुक्तांना भेटण्यास इच्छूक आहे. परंतु, तिला मुंबईत येऊ दिले जात नाहीये. त्यामुळे त्या पीडितेला मुंबईत येण्यासाठी संरक्षण द्यावे, या संदर्भातील पत्र आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असल्याचे शिवसेना उद्धव ठाकरे सेनेच्या प्रवक्ता मनिषा कायंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी थेट लोकसभेत आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. सुशांतसिंह रजपूर यांच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला AU नावाने ४४ कॉल आले होते. राहुल शेवाळे यांच्या आरोपानंतर AU कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. AU म्हणजे आदित्य आणि उद्धव आहेत का? असा प्रश्न लोकसभेत खासदार राहुल शेवाळे यांनी उपस्थित केला. लोकसभेत हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नितेश राणे म्हणाले..
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी आज माध्यमांशी बोलताना केली. खासदार राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेमध्ये आदित्य ठाकरे यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप केला होता. या संदर्भात पत्रकारांनी राणे यांना प्रश्न विचारला असता राणे म्हणाले, मी पहिलेपासूनच आदित्या ठाकरेंची चौकशी करण्याची मागणी करीत आहे. आता राहुल शेवाळे यांनी मागणी केल्यानुसार आदित्य ठाकरे यांची चौकशी करून नार्को टेस्ट घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडे आहे. तो सुद्धा पुन्हा नव्याने करण्यात यावा. सुशांत सिंह, रिया चक्रवर्ती, दिशा सालियान यांची नावे जेव्हा-जेव्हा पुढे येतात तेव्हा आदित्य ठाकरे यांचही नाव पुढे येते. तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची गंभीरता पाहता आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. दरम्यान, या प्रकरणावरुन सभागृहात जोरदार गोंधळ झाला. याप्रकरणात अध्यक्षांना पुन्हा-पुन्हा विधानसभा काही काळासाठी तहकूब करावी लागली.