लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पत्रकारांनी निर्भयपणे, नि:पक्षपणे कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य मांडावे, शिक्षित करावे, ही समाजाची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षातील चित्र याच्या विपरीत आहे. हे चित्र पत्रकारितेचे दायित्व विसरल्यासारखे असून सत्याची अपेक्षा ठेवणाऱ्या समाज व वाचकांवर अन्याय केल्यासारखे आहे. मात्र भीती बाळगू नका, कारण प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांच्या संरक्षणात समाज उभा होतो, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद यांनी व्यक्त केले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वर्गीय अनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. शुक्रवारी बाबुराव धनवटे सभागृह, शंकरनगर येथे आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार विजय सातोकर आणि शैलेश पांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्रफुल्ल गाडगे, टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. एस.एन. विनोद पुढे म्हणाले, ब्रिटिश शासनाशी लढणारी पत्रकारिता आज आपल्याच सरकारच्या विरोधात लिहायला घाबरत आहे. पत्रकार आणि माध्यम संस्था दबाव असल्यागत व्यक्तिविशेष व दलविशेषाचा महिमामंडन आणि प्रचार प्रसार करण्याचा अजेंडा स्वीकारल्याचे दिसते. एवढा की, सार्वजनिक सभेत माध्यमांबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानंतरही पत्रकार, माध्यम संस्था किंवा पत्रकार संघटनांनी त्याचा निषेध केला नाही, याचे आश्चर्य वाटत असल्याचे ते म्हणाले. आपल्या व्यवसायाचा आदर्श सोडल्यास प्रतिमा मलीन होईल आणि समाजही विश्वास ठेवणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी पत्रकारितेत व्यक्तिगत, सामुदायिक, सामाजिक निर्भयता, निर्भिकता नसेल तर लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे मत व्यक्त केले. सत्कारमूर्तींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गिरीश गांधी यांनी केले. संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. प्रतिष्ठानचे सचिप दिलीप जाधव यांनी आभार मानले.
प्रामाणिक पत्रकारांना मिळते समाजाचे संरक्षण : एस.एन. विनोद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 1:16 AM
पत्रकारांनी निर्भयपणे, नि:पक्षपणे कुठलाही आडपडदा न ठेवता सत्य मांडावे, शिक्षित करावे, ही समाजाची अपेक्षा असते. गेल्या काही वर्षातील चित्र याच्या विपरीत आहे. हे चित्र पत्रकारितेचे दायित्व विसरल्यासारखे असून सत्याची अपेक्षा ठेवणाऱ्या समाज व वाचकांवर अन्याय केल्यासारखे आहे. मात्र भीती बाळगू नका, कारण प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्यांच्या संरक्षणात समाज उभा होतो, असे मनोगत ज्येष्ठ पत्रकार एस.एन. विनोद यांनी व्यक्त केले.
ठळक मुद्देअनिलकुमार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान