नागपुरात नितीन गडकरींच्या घराबाहेर 'राडा'; पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा काँग्रेसकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 11:00 AM2022-02-10T11:00:52+5:302022-02-10T12:44:28+5:30
नागपुरात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते दाखल झाले असून जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. काल अनेक शहरात मोदी यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेसच्यावतीनेआंदोलन करण्यात आले होते. आज नागपुरात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते दाखल झाले असून जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तर, भाजप कार्यकर्तेही याठिकाणी जमले असून त्यांच्याकडूनही प्रदर्शन केले जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी लोकसभेत महाराष्ट्र काँग्रेसने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला असे वक्तव्य केले होते. या आरोपामुळे काँग्रेस संतापली आहे. जोपर्यंत मोदी माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला होता. त्यानुसार नागपूरमध्ये हे आंदोलन करण्यात आले आहे. परिस्थिती पाहता पोलिसांनी याठिकाणी तगडा बंदोबस्त लावला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात नारेबाजी करत निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान, काँग्रेस शहराध्यक्ष विकास ठाकरे, आ. अभिजित वंजारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नागपुरातील नितीन गडकरी यांच्या निवासस्थानासमोर बीजेपी आणि काँग्रेसचे आंदोलन, जोरदार घोषणाबाजी #Nitingadkari#Congress#BJPpic.twitter.com/ahe62U1vDX
— Lokmat (@lokmat) February 10, 2022
महाराष्ट्र काँग्रेसने संपूर्ण देशामध्ये कोरोना पसरवला असे वक्तव्य लोकसभेत केले, जे अतिशय दुर्भाग्यपूर्ण आहे. ही बाब महाराष्ट्राच्या व महाराष्ट्रातील जनतेचा घोर अपमान करणारी आहे. याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत असल्याचे असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. तर, दुसरीकडे भाजपही चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनीही गडकरींच्या निवासस्थानाबाहेर जमा होत आंदोलन सुरू केले आहे.