फोरमचे अमित बांदूरकर, अभिजित झा, गजेंद्रसिंग लोहिया व प्रतीक बैरागी यांनी निषेध आंदाेलन केले. महानगरपालिकेने जाहिरात प्रसारित करून या वृक्षतोडीस परवानगी देण्यापूर्वी नागरिकांचे आक्षेप मागविले आहेत. यासाठी १८ मार्च ही अंतिम तारीख आहे. महापालिकेने नीरीची २४९ व फुटाळा येथील १५० झाडे ताेडण्यावर आक्षेप मागितले आहेत. फोरमने महानगरपालिकेच्या हेतूवर शंका उपस्थित करीत वृक्षताेडीला मनाई करण्याऐवजी जाहिरात प्रसारित करून आक्षेप मागविणे दुर्दैवी असल्याची टीका केली. शहरातील वृक्षसंपत्तीचे संवर्धन करणे महापालिकेची जबाबदारी आहे. मात्र ही जबाबदारी विसरून वृक्षतोडीसाठी अर्ज स्वीकारून आक्षेप कसे काय मागवू शकते, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रस्तावित वृक्षतोडीवर आक्षेप मागविण्यासाठी महापालिकेने लाॅकडाऊनचा काळ का निवडला, असा प्रश्न उपस्थित केला. मेट्रोने पर्यावरणाचा कुठलाही विचार न करता मनमानी काम केल्याने शहरातील पर्यावरणाचा सत्यानाश झाल्याचा आरोप अभिजित झा यांनी केला. वृक्षतोडीसाठी मागण्यात आलेली परवानगी तत्काळ नाकारून महानगरपालिकेने मेट्रोकडे आजवर तोडलेल्या वृक्षांचा हिशेब मागावा. मेट्रोने शहरातील किती झाडे तोडली त्या मोबदल्यात किती झाडे लावली याची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. याविरोधात आंदोलन करण्याचा व न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही फोरमने दिला आहे.
मेट्रोसाठी नीरी, फुटाळा येथील वृक्षतोडीचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 4:08 AM