नागपूर :नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठात्यांसोबत खा. हेमंत पाटील यांनी केलेल्या गैरवर्तणुकीचा निषेध म्हणून वरिष्ठ, युजी, निवासी डॉक्टरांसह इंटर्न्स व परिचारिकांनी गुरुवारी मेयो, मेडिकलसमोर जोरदार निदर्शने केली. ‘देव म्हणून नाही, माणूस म्हणून तरी वागणूक द्या’, अशी हाकही सरकारला दिली.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जीवनरक्षक औषधांचा तुटवडा आहे. डॉक्टरांसह वर्ग ३ व वर्ग ४ कर्मचाऱ्यांचा जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत, असे असतानाही डॉक्टर रुग्ण सेवा देत असतात. नांदेडमध्येही अशीच स्थिती असताना त्याचे खापर डॉक्टरांवर फोडण्यात आले.
खा. पाटील यांनी अधिष्ठात्यांसोबत केलेली वर्तणूक अत्यंत घृणास्पद आणि निषेधार्ह आहे. त्यांनी माफी मागावी, यासाठी गुरुवारी मेडिकलमध्ये दुपारी १२ वाजता तर मेयोमध्ये दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटना (एमएसएमटी), निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’, युजी डॉक्टर्स, इंटर्न्स व महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटेने जोरदार नारे निदर्शने केली. सहभागी संघटनांनी अधिष्ठात्यांना निवेदन दिले. मेयो, मेडिकलमधील डॉक्टरांनी काळी रिबीन बांधून रुग्णसेवा दिली. प्रत्येक जण नांदेडमधील घटनेचा संताप व्यक्त करताना दिसून आले.
- अन्यथा आंदोलन तीव्र
मेडिकल मार्डचे अध्यक्ष डॉ. मनीष बागडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, नांदेड वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठात्यांना दिलेली वागणूक ही अमानवीय आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. खा. हेमंत पाटील यांनी जाहिर माफी मागितली नाही तर सेंट्रल मार्डच्या सूचनेनुसार हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.