नरेश डोंगरे - नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्या कामगारांना कामावरून काढून टाकल्याने आक्रमक झालेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या आंदोलकांनी अन्यायग्रस्त कामागारांना घेऊन थेट रेल्वे विभागीय व्यवस्थापकांच्या (डीआरएम) कार्यालयात धडक दिली. तेथे कामगारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने आज दुपारी कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
रेल्वेतील कंत्राटी कामगारांच्या संबंधाने गेल्या अनेक महिन्यांपासून अन्यायकारक धोरण अवलंबिले जात असल्याची तक्रार आहे. कंत्राटदार आणि त्यांची माणसे भ्रष्टाचार करतात, कामगारांची पिळवणूक करतात आणि त्याबाबत आवाज काढल्यास त्यांना कामावरून काढून टाकतात. या संबंधाने वरिष्ठांकडे निवेदने देऊनही त्याची दखल घेतली जात नाही. उलट भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविणाऱ्या कामगारांवर अन्याय केला जातो. दोन दिवसांपूर्वी अशाच पद्धतीने रेल्वेतील सफाई कामगारांना अचानक कामावरून काढून टाकल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर, शिवसेना ठाकरे गटाचे नितीन तिवारी यांनी अन्यायग्रस्त महिला, कामगारांसह सोमवारी दुपारी डीआरएम कार्यालयावर धडक दिली. प्रचंड घोषणाबाजी करून न्यायाची मागणी करीत आंदोलकांनी कार्यालय परिसरात ठिय्या मांडल्याने परिसरात गोंधळ निर्माण झाला.
तणाव वाढत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तिवारी यांची समजूत काढून त्यांना विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांच्या कक्षात चर्चा करण्यासाठी नेले. तेथे डीआरएम अग्रवाल यांनी आंदोलकांची बाजू ऐकून घेतल्यावर कुणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर आंदोलक शांत झाले.