केंद्राचा निषेध करीत काँग्रेसने नागपुरात काढला मशाल मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2022 09:53 PM2022-06-24T21:53:17+5:302022-06-24T21:53:59+5:30
Nagpur News केंद्र सरकार हुकूमशाही, अराजकतावादी असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेस कमिटीने शुक्रवारी मशाल मोर्चा काढण्यात आला.
नागपूर : केंद्र सरकार हुकूमशाही, अराजकतावादी असल्याचा आरोप करीत प्रदेश काँग्रेस कमिटीने शुक्रवारी मशाल मोर्चा काढण्यात आला. या वेळी वाढती महागाई, नोटाबंदी, महिलांवरील अत्याचार, शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करीत आता अग्निपथ योजनेच्या नावाखाली बेरोजगारांशी आणि देशाच्या सुरक्षेशी खेळले जात असल्याचा दावा करण्यात आला.
शुक्रवारी सायंकाळी संविधान चौक ते व्हरायटी चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या मशाल मोर्चात सहभागी काँग्रेस नेत्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. विरोधी पक्षनेत्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकरणात गोवून लोकशाहीचा आवाज दाबला जात असल्याचा आहे. तसेच ईडीचा धाक दाखवून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ईडीकडून तपास सुरू आहे, असा आरोप करण्यात आला.
या मशाल मोर्चात राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे के. के. पांडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव नरेंद्र जिचकार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सहसचिव नितीन कुंभलकर, महासचिव संजय दुबे व तानाजी वनवे, सचिव कमलेश समर्थ व आर. एम. खान नायडू, माजी नगरसेवक प्रफुल गुडधे-पाटील, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.