नागपूर : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ज्येष्ठ नागरीकांच्या संस्था संघटनांनी सरकार आणि प्रशासनाकडून ज्येष्ठावर होत असलेला अत्याचार व छळाच्या विरोधात संविधान चौकात निदर्शने करून लक्ष वेधले. ज्येष्ठांचे जीवन सुसह्य व्हावे, वृद्धापकाळ चांगला जावा, शारिरीक व मानसिक आरोग्य सुस्थितीत रहावे, याकरिता केन्द्र व राज्य सरकारकडून सुचना प्रसारित केल्या. परंतु त्याचे पालन होत नाही. ज्येष्ठ नागरिक पदाधिकाऱ्यांना भेटीकरीता २ ते ३ तास ताटकळत ठेवणे, प्राधान्य असलेल्या सोयी सुविधा न देणे, प्रश्न रेंगाळत ठेवणे, ठराविक वेळेत निर्णय न घेणे, याकडे लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी फलक झळकवित घोषणा देण्यात आल्या.
२०१३ मध्ये भगतसिंग कोशियारी समितीने मान्य केलेली ईपीएस ९५ पेंशन वाढ व महागाई भत्ता दिलेला नाही. ज्येष्ठांची रेल्वे प्रवास सवलत बंद केली, नासुप्र, मनपा व ३३ पोलीस स्टेशनमध्ये जेष्ठ नागरिक कक्ष स्थापन केला नाही, या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात सुरेश रेवतकर, मनोहरराव खर्चे, हुकूमचंद मिश्रीकोटकर, प्रकाश पाठक, दादा झोडे, नामदेव फटींग, वसंतराव पाटील, अधीर बागडे, पंढरीनाथ सालीगुंजेवार, पुरूषोत्तम शेंदरे, काशीनाथ धांडे, हेमंत दानव, प्रमिला राऊत, भगवान टिचकुले, संजय अस्वले, गुलाब शेंडे, डी. एन. सवाईथुल, भाऊराव कळंबे, डाॅ. कमल मोहता आदी उपस्थित होते. केंद्र व राज्य शासन व प्रशासन यांना ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. संचालन सुरेश रेवतकर यांनी केले, तर आभार हेमंत दानव यांनी मानले.