लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अखिल भारतीय किसान संघर्ष समिती आणि किसान सभेच्या वतीने सोमवारी पाळण्यात आलेल्या किसान महिला सन्मान दिनी पंतप्रधानांविरुद्ध निदर्शने करण्यात आली. या दरम्यान झालेल्या प्रतीकात्मक आंदोलनात पोलिसांनी आंदोलकाला ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.
संविधान चौकात दुपारी २.३० वाजता हे आंदोलन झाले. या आंदोलनावर सुनावणी करताना आंदोलनात महिलांच्या उपस्थितीवर आक्षेप घेऊन त्यांना घरी पाठवा असे म्हटले होते. मात्र शेतकरी महिला शेतीच्या कामात ७० टक्के सहभाग घेतात. त्यामुळे त्यांनी आंदोलनात सहभाग घेतल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. भांडवलदारांच्या हिताचे शेतकरी कायदे केल्याच्या निषेधार्थ किसान महिला सन्मान दिन आंदोलनात पंतप्रधान मोदी यांच्याविरूद्ध प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. दिलीप तायडे यांनी हे प्रतिकात्मक आंदोलन केल्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. व्हॅनमध्ये बसवून त्यांना नेत असताना महिलांनी विरोध केला. त्यानंतर आंदोलनातील साहित्य जप्त करून तायडे यांना सोडण्यात आले.
दरम्यान, आंदोलकाळात महिला नेत्यांची भाषणे झाली. वर्किंग वुमेन्स फोरमच्या ज्योती अंडरसहारे, जयश्री चहादे, करुणा साखरे, प्रीती राहुलकर, अनिता ऋषेसरी, रेखा कांबळे, भारतीय महिला फेडरेशनच्या मीना देशपांडे, चंदा अपराजित, भाग्यश्री सहारे, बबिता डोंगरवार, जेबा, माया जंगम, सुमन गोंडाणे, यमुना सोमकुवर, जनवादी महिला समितीच्या विजया जांभुळकर, अंजली तिरपुडे, स्नेहलता जांभुळकर, अंजली धारगावे, आरती सोनवणे, मंगला जुनघरे, प्रीती पराते, आशू सक्सेना, मीना पाटील, चंदा वासनिक, शारदा बरेहा, प्रमिला नाईक, गीता गोंडाणे, करुणा रंगारी आदी सहभागी झाले होते.