नागपूर : राष्ट्रीय विरोधी दिनानिमित्त गुरुवारी शहर व ग्रामीण भागातील शासकीय कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली. शहरात संविधान चौक येथे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे हा दिवस पाळण्यात आला.
यानंतर विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी आर. विमला यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. जुनी पेन्शन लागू करा, रिक्त पदे त्वरित भरा, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करा, अनुकंपा तत्त्वावर नोकरी द्या, कामगार विरोधी शिफारशी मागे घ्या, वाढीव महागाई भत्ता द्या, आदी मागण्यांचा यात समावेश हाेता.
या आंदोलनात महाराष्ट्राचे अशोक दगडे, ज्ञानेश्वर महल्ले, नाना कडबे, यशवंत कडू, बुधाजी सुरकर, प्रल्हाद शेंडे, देवेंद्र शिदोडकर, राज ढोमणे, रसिका झंजाळ, सचिन गायकवाड, सुनील व्यवहारे, स्नेहल खवले, प्रशांत राऊत, राजेंद्र ठाकरे, मेघा कराळे, राजेश पारेकर आदींसह विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.