नागपूर : बागेश्वर धामचे पीठाधिश्वर धीरेंद्र कृष्णजी महाराज यांनी नागपुरात भरविलेल्या ‘दिव्य दरबार’वर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला असून, समितीचे संस्थापक व राष्ट्रीय संघटक, तसेच महाराष्ट्र शासनाच्या जादूटोणा विरोधी कायदा जनजागृती, प्रसार आणि प्रचार कार्यक्रम अंमलबजावणी समितीचे सहअध्यक्ष प्रा. श्याम मानव यांनी महाराजांना ‘दिव्य दरबार’ सिद्ध करण्याचे आणि ३० लाख रुपये घेऊन जाण्याचे आव्हान पत्रपरिषदेतून केले आहे.
महाराजांनी नागपुरात भरविलेल्या दिव्य दरबारासोबतच ऑनलाईन मीडियावर उपलब्ध असलेले व्हिडीओज आणि त्यांची कात्रणे सादर करीत, श्रीरामकथेच्या नावावर सर्वसामान्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोप मानव यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या जादूटोणा कायद्यानुसार हा गुन्हा असून, नागपुरातील एसीपी क्राईम हे या कायद्याचे दक्षता अधिकारी असल्याने, त्यांनी ताबडतोब या प्रकारावर आक्षेप घेत गुन्हा नोंदविण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, या आयोजनाच्या स्थळी राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही भेट दिली आहे. शिवाय, जादुटोणा विरोधी समितीचे मुख्यमंत्री सध्या अध्यक्ष आहेत. या आयोजनाबद्दल हे तिघेही अनभिज्ञ असले तरी या आयोजनाबद्दल संबंधितांवर तसेच महाराजांवर जादुटोणा कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी प्रा. श्याम मानव यांनी पत्रपरिषदेतून केली आहे. पत्रपरिषदेला अ. भा. अंनिसचे सुरेश झुरमुरे, हरिश देशमुख, छाया सावरकर, प्रशांत सपाटे उपस्थित होते.