लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत सर्वांसाठी घरे - २०२२ - प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ४,३४५ घरकुले बांधण्यात आलेली आहेत. या घरकुलांच्या वितरणासाठी ऑगस्ट-२०१९ मध्ये लॉटरी काढण्यात आली होती, त्यात २९८८ लाभार्थी पात्र ठरले असून त्यांना घरकुलाचा पहिला हप्ता भरण्यासाठी वेळोवेळी कळविण्यात आलेले आहे. तथापि, आतापर्यंत केवळ ९१७ लाभार्थ्यांनी घरकुलाची रक्कम प्राधिकरणाकडे जमा केलेली आहे. बहुतांश लाभार्थ्यांनी अद्याप आवश्यक रक्कम जमा केलेली नाही. त्यांना आवश्यक असलेला कर्जपुरवठा करा, असे बँकांना तर पट्टा रजिस्ट्री करून देण्याबाबत नासुप्र अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
घरकुल लाभार्थींना कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी नुकतीच एनएमआरडीएच्या आयुक्त शीतल तेली-उगले, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रीयीकृत ब्ँका, खासगी, सहकारी व विविध वित्तीय संस्था प्रमुख व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. बँकांच्या विनंतीनुसार प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना गाळ्याच्या ताबा दिला आहे, त्या गाळेधारकांना एका महिन्याच्या आत पट्टा रजिस्ट्री करून देण्याबाबत नासुप्र अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. रजिस्ट्रीनंतर रजिस्ट्रीची मूळ प्रत ज्या बँकेकडून कर्ज घेतले आहे त्या बँकेकडे सादर करावयाची आहे. लाभार्थ्यांना सुलभ कर्ज उपलब्ध व्हावे, यासाठी बँकांनी स्वत:हून पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
लाभार्थ्यांच्या मागणीनुसार बँकांनी लाभार्थ्यांना १०० टक्के कर्ज उपलब्ध करावे. त्यासाठी लाभार्थ्यांना आयकर विवरण पत्राची सक्ती करू नये तसेच आवश्यक तेवढ्याच कागदपत्रांची मागणी करण्यात यावी, असेही बँकांना सूचित करण्यात आले. याला बँकानी सकारात्मक प्रतिसाद दिला.
एनएमआरडीएचे अपर आयुक्त हेमंत पवार, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, एनएमआरडीए, नासुप्र अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.