लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपूर शहरातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. रुग्णांना बेडसाठी भटकंती करावी लागत आहे. हजारो लोकांचे बळी गेले. त्यात पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. याचा विचार करता शहरातील नागरिकांचा जीव वाचावा, यासाठी महापालिकेने आपली जबाबदारी म्हणून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी. यासाठी २०२१-२२ या वर्षाच्या मनपा अर्थसंकल्पात ५०० कोटींची विशेष तरतूद करावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
मागील दोन वर्षांचा विचार करता पुढील वर्षाचा महापालिकेचा अर्थसंकल्प २,५०० ते २,७५० कोटींच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे. यात १,३०० ते १,४०० कोटींचा आस्थापनावर खर्च वगळता उर्वरित १,३०० ते १,३५० कोटीतून विकास कामांवर होणारा खर्च आरोग्य सुविधाकडे वळता करावा. यातून महापालिकेची पाच रुग्णालये अपग्रेड करण्यात यावी. येथे बेडची संख्या वाढवून ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर सुविधा निर्माण करावी. आवश्यक असलेली पदे भरण्यात यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
काँग्रेसचे नगरसेवक संजय महाकाळकर यांनी सोमवारी या संदर्भात महापौर दयाशंकर तिवारी यांना पत्र दिले. मनपा अर्थकल्पात आरोग्य सुविधासाठी ५०० कोटींचा विशेष निधी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते दुनेश्वर पेठे यांनीही अशीच मागणी केली आहे. आज विकासापेक्षा नागरिकांचा जीव वाचविणे महत्त्वाचे आहे. सिमेंट रोड, स्मार्ट सिटी प्रकल्पासह प्रस्तावित प्रकल्पाचा निधी आरोग्य सुविधाकडे वळता करावा, अशी मागणी केली. भाजपचे नगरसेवक सतीश होले यांनीही झोन स्तरावर आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी विशेष निधीची तरतूद करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गटनेते वेदप्रकाश आर्य यांनी अर्थसंकल्पात ४०० ते ५०० कोटींचा निधी आरोग्य सुविधासाठी उपलब्ध करावी. तसेच मनपाचा अर्थसंकल्प तातडीने सादर करून हा निधी उपलब्ध करावा, अशी मागणी केली आहे.
....
विशेष निधीतून या सुविधा निर्माण करा
- कोविड रुग्णांना उपचार मिळण्यासाठी मनपा रुग्णालये सक्षम करा.
-ऑक्सिजन, आयसीयू व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा.
-मनपा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारण्यात यावे.
- कोविड रुग्णांना औधषी उपलब्ध कराव्या.
- मनपा रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांची पदे भरण्यात यावी.