लोकमत न्यूज नेटवर्कवसीम कुरैशीनागपूर : कोविड-१९ (कोरोना आजाराने मृत झालेला) व्यक्तीचा मृतदेह दफन करण्यासाठी वेगळी जागा देण्यात यावी, असा निर्णय मरकजी मजलिस मुस्लिम कब्रस्तानच्या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे व मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना यासंबंधीचे निवेदन सादर करण्यात येणार आहे.मोमिनपुरासारख्या दाट लोकसंख्या असलेल्या परिसरात कब्रस्तानला लागूनसुद्धा अनेक घरे आहेत. याशिवाय शहरातील मध्यभागी व दाट लोकसंख्येच्या या परिसरातील कब्रस्तानमध्ये आधीच अनेक जणांच्या कबरी आहेत. ठराविक कालावधीपूर्वी या कबरीवरील जागा खोदता येत नाही. या पार्श्वभूमीवर मजलिसचे अध्यक्ष कामिल अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कोविड-१९ ने ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे मृतदेह दफन करण्यावर चर्चा करण्यात आली. मजलिसचे सचिव सय्यद अश्फाक अली यांनी सांगितले की, मनपाच्या दिशानिर्देशानुसार या महामारीमुळे असे मृतदेह दफन करण्यासाठी १५ फूट खोल खड्डा खोदणे आवश्यक आहे. यासाठी जेसीबी मशीनची गरज पडते. अशी कबर खोदण्यासाठी जागाही जास्त लागते. तसेच या कबरीला २० वर्षापर्यंत हात लावता येणार नाही. दुसरीकडे सामान्यपणे शहरी भागातील कब्रस्तानमध्ये असे मृतदेह दफन करणे आरोग्याच्या दृष्टीनेही योग्य नाही. त्यामुळे असे मृतदेह शहराबाहेरच दफन करणे योग्य आहे. त्यामुळे शहराबाहेर कुठेही जवळपास ५ एकर जागा केवळ असे मृतदेह दफन करण्यासाठीच उपलब्ध करण्यात यावी.विशेष म्हणजे मोमिनपुरा येथील कब्रस्तान जवळपास २०० वर्षे जुने आहे. येथे राहणारे अनेक लोक जाफरनगर, सदर आदी ठिकाणी जाऊन राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही नातेवाईकाचे निधन झाले तरी त्यांना मोमिनपुरा येथील कब्रस्तानातच आणले जाते.