कुही : तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचा मूळ व्यवसाय शेती आहे. विस्तीर्ण तालुक्याचा आधार शेती असल्याने कृषी विभाग वेळीच प्रत्येक भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करू शकत नाही. परिणामी, नैसर्गिक व इतर कीड व राेग व्यवस्थापनाबाबत माहिती वेळेत मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट येत आहे. ही बाब लक्षात घेता तालुका कृषी विभागाला एक वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी पदवीधर संघटनेने केली आहे.
तालुका कृषी विभाग कार्यालयास वाहन उपलब्ध झाल्यास कृषी अधिकारी शेतकऱ्यांना याेग्य मार्गदर्शन करू शकतील व त्यांच्या उत्पादनात वाढ हाेईल. यामुळे प्रगतशील शेतकऱ्यांची संख्या वाढण्यास मदत हाेईल, शिवाय तरुण बेराेजगार शेती करण्याकडे आकर्षित हाेतील. त्यामुळे या कार्यालयास वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष उदय गर्जे व संस्थापक महेश कडूस पाटील यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने आ. राजू पारवे यांना नुकतेच निवेदन साेपविले. यावेळी पं.स. सदस्य मंदा डहारे, वैभव मते, किरण धंदरे, अमित डाहारे, निकेश भोयर, कैलास खडसिंगे आदी उपस्थित होते.