लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांपैकी एक पीपल्स रिपब्लिकन पार्टीला विधानसभा निवडणुकीत सहा जागा मिळाल्या असल्याचा दावा पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे. मात्र नागपूर जिल्ह्यातून एकही जागा लढविणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शुक्रवारी पत्रपरिषदेदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. काँग्रेस राष्ट्रवादी यांच्या नेतृत्वातील धर्मनिरपेक्ष विचारांच्या पक्षांच्या आघाडीत सहभागी होत असल्याचे सांगत विधानसभा निवडणुकीत आघाडीतील जागा वाटपाबाबत गणित निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये पीरिपाला सहा जागा देण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीने मान्य केल्याचा दावा त्यांनी केला. मिळालेल्या जागांमध्ये भंडारा, भुसावळ, नाशिक, घाटकोपर, कुर्ला, ठाणे, बडनेरा या जागांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पीरिपाचे नेते जयदीप कवाडे हे भंडारा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मात्र नागपुरातून पक्षाला उमेदवारी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले. नागपूरच्या एकाही जागेवर आपला आग्रह नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीवर टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणाऱ्या रिपब्लिकन पक्षांना आणि आंबेडकरी चळवळीतील नेत्यांना अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीपासून वंचित ठेवले, असा आरोप प्रा. कवाडे यांनी केला.७ ऑक्टोबरला भीमसैनिकांचा मेळावापीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला ७ ऑक्टोबर रोजी भीमसैनिकांच्या ३९ व्या राष्ट्रीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रा. कवाडे सांगितले. सकाळी ११ ते ५ वाजता दरम्यान आनंदनगर, सीताबर्डी येथे हा मेळावा होईल. मेळाव्यानंतर सायंकाळी ५.३० वाजता खुले अधिवेशन घेण्यात येणार असून, आंध्र प्रदेशाचे माजी मंत्री गोलापल्ली सूर्याराव यांचे हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी रिपब्लिकन चळवळीतील ज्येष्ठ नेते नानासाहेब इंदिसे, पँथर नेते गंगाधर गाडे, सूर्यकांत गाडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
पीरिपाला आघाडीमध्ये मिळाल्या सहा जागा : जोगेंद्र कवाडे यांचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 10:14 PM
काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतील घटक पक्षांपैकी एक पीपल्स रिपब्लिकन पार्टीला विधानसभा निवडणुकीत सहा जागा मिळाल्या असल्याचा दावा पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केला आहे.
ठळक मुद्देवंचितमध्ये आंबेडकरी नेत्यांना स्थान नाही