लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर दुकान लावणाऱ्या महिलेची भाजी इतस्तः फेकून देणाऱ्या जरीपटक्यातील पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांची चौकशी सुरू झाली आहे. त्यांना पोलीस आयुक्तालयातून आज 'शोकॉज नोटीस'ही बजावण्यात आली आहे. दरम्यान, 'लोकमत'मध्ये उमटलेल्या वृत्तामुळे या घटनेचा चोहोबाजूंनी निषेध केला जात आहे. शहर पोलीस दलानेही त्यांच्या ट्विटरवर संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन अशोभनीय असून संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
कोरोनामुळे सर्वत्र दहशत पसरली आहे. मात्र, पोटाची खळगी भरण्यासाठी रोजच्या जगण्या-मरण्याची लढाई लढणारे छोटे छोटे दुकानदार रस्त्यावर दुकाने लावतात. त्यामुळे तेथे ग्राहक गर्दी करतात आणि कोरोना प्रादुर्भावाचा धोका अधिक वाढतो. जरीपटक्यात मंगळवारी आठवडी बाजारात अशाच प्रकारे एका महिलेने रस्त्यावर भाजीचे दुकान लावले होते. तेथे ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पाहून जरीपटका पोलीस पथकाने तिला दोन वेळा दुकान गुंडाळण्यास सांगितले. मात्र मर्यादित वेळ संपूनही महिलेने दुकान सुरू ठेवल्याने गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक संतोष खांडेकर यांनी तिच्या दुकानातील भाजी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिली. या घटनेचा व्हिडीओ गुरुवारी सायंकाळी व्हायरल झाला. लोकमतने त्यासंबंधीचे वृत्त आज प्रकाशित केले. त्यामुळे चोहोबाजूने निषेधाचा सूर उमटला. ट्विटर, व्हाॅट्सॲपसह सोशल मीडियावर लोकमतच्या वृत्ताचे कात्रण आणि तो व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला. या घटनेचा चोहोबाजूने निषेध नोंदविण्यात आला. त्याची दखल घेत पोलीस आयुक्तांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश दिले. त्यानुसार खांडेकर यांना शो काज नोटीस बजावण्यात आली. नागपूर पोलीस आयुक्तालयाच्या ट्विटरवरही या घटनेच्या संबंधाने खुलासा करण्यात आला. "ही घटना निंदनीय असून संबंधित अधिकाऱ्याचे वर्तन अशोभनीय असल्याचे त्यात म्हटले आहे.
उपायुक्तांकडून चौकशी परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून उपनिरीक्षक खांडेकर यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.