नागपूर : मागील काही काळापासून नागपुरात हत्येसारख्या गुन्ह्यांमध्ये लहान मुद्देच कारणीभूत असल्याची बाब समोर आली आहे. गुन्हे नियंत्रणात आणायचे असतील तर त्यामागील कारणे व त्यातील मानसिकता समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेऊन गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पावले उचलण्यात येतील, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ.रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली. मंगळवारी नागपूर श्रमिक पत्रकार संघ, पत्रकार क्लब ऑफ नागपूर व टिळक पत्रकार भवन ट्रस्टतर्फे ‘मिट द प्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शुल्लक कारणांवरून हत्या होत आहेत. अगदी जवळच्या व्यक्तीचीदेखील हत्या करण्यापर्यंत मजल जाते आहे. या घटनांचा मानसोपचारतज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. प्रत्येक तक्रारीची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. यामध्ये हलगर्जीपणा आढळल्यास पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल. अवैध धंदे, ड्रग्ज माफिया, सावकारी, महिलांवरील गुन्हे, भूमाफिया, फसवणूक, सायबर गुन्हे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींची प्राधान्याने दखल घेतली जाईल. व्हाईट कॉलर गुन्हेगारांवरही पाळत ठेवली जाईल, असे त्यांनी सांगितले.
‘सायबर’ विभागाला तांत्रिक सुविधा पुरविणारमागील काही काळापासून सायबर गुन्हेदेखील वाढीस लागले आहेत. सायबर गुन्हेगार काही ना काही फुटप्रिंट्स मागे ठेवतोच. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक तांत्रिक सुविधा व सॉफ्टवेअर्स पुरविण्यात येतील. तसेच सायबरच्या तक्रारींवर तातडीने कारवाई करण्याची सूचनादेखील सायबर पोलीस पथकाला देण्यात आल्या आहेत. त्यांना आवश्यक प्रशिक्षणदेखील देण्यात येईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले. शहरात जागृतीसाठी ‘सायबर ॲंम्बेसेडर’ तयार करण्यात येतील. विशेषत: शाळा-महाविद्यालयात जागृती मोहीम राबविण्यात येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. यावेळी पत्रकार क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर उपस्थित होते.
पबचालकांना कडक इशाराशहरातील अंमली पदार्थांचे जाळे वाढले आहे. विशेषत: काही पब्ज व हॉटेलमध्ये त्यांचे सेवन करण्यात येते. त्यातून गुन्हेदेखील घडतात. पब, लाउंज, हॉटेल, क्लबमध्ये गुन्हा किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास त्याच्या मालकांवर गुन्हा दाखल केला जाईल आणि परवाना रद्द केला जाईल. मोठमोठे पेडलर्स पकडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नागपूर हे अंमली पदार्थ तस्करांसाठी 'ट्रान्झिट सिटी' आहे. त्यांचा माल येथून जातो. त्यावरदेखील लक्ष ठेवण्यात येत आहे.
काय म्हणाले आयुक्त?-निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तयारी सुरू आहे. महत्त्वाच्या इमारतींचे सेफ्टी ऑडिट केले जात आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून गुन्हेगारांवर लक्ष ठेवले जात आहे.- ऑनलाइन शस्त्रविक्रीचा मुद्दा गंभीर आहे. त्याबाबत पावले उचलण्याचे निर्देश.- गुन्हेगारांना मदत करणारे किंवा गुन्ह्यात सहभागी असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांची खरी जागा दाखविली जाईल. कठोर कारवाई होईल.- लोकांनीदेखील वाहतूकीच्या नियमांचे पालन करावे- महिला अत्याचाराच्या प्रकरणांत त्वरित गुन्हा नोंदविणे आवश्यक. टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई.- गुन्हेगारांच्या घराची नियमित झडती घेणार.- पोलीस अधिकाऱ्यांना संवेदनशील वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या बैठका घेण्याच्या सूचना.