लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - डॉक्टरला मुलांच्या अपहरणाची धमकी देऊन एक कोटी रुपयांची खंडणी मागणारे पत्र पाठविणारी शीतल ईटनकर हिच्याकडून पोलिसांनी खंडणी मागणारे पत्र पाठविण्याच्या प्रकाराची रिहर्सल करून घेतली. त्याला पोलिसांच्या भाषेत क्राईम सीन रिक्रिएट करणे, असे म्हणतात. दरम्यान, शीतलची मानसिक अवस्था वर्षभरापासून चांगली नव्हती अन् ती अनेक दिवसांपासून मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेत होती, अशी माहिती उघड झाली आहे. शीतलवर कोविडचे उपचार झाले होते. या उपचारांच्या निमित्तानेच ती डॉ. तुषार पांडे यांच्या संपर्कात आली होती. त्यांची आर्थिक अवस्था खूप चांगली असल्याचे तिच्या लक्षात आले होते. त्यातूनच तिच्या डोक्यात पत्र लिहून खंडणी मागण्याची कल्पना आली. मनासारखा खर्च करता येत नसल्यामुळेदेखील शीतल चिडचिड करायची. सव्वा लाख रुपये पगार असूनही पती पैशा पैशाचा हिशेब मागत असल्याने तिची मानसिक अवस्था बिघडली होती. तिच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचारही सुरू होते. मात्र, मला काहीच झाले नाही, असे म्हणत ती उपचाराचा आग्रह धरणाऱ्यांनाच धारेवर धरत होती. शीतलचे अन्य नातेवाईक तसेच तिच्या दोन्ही मुली तिला मानसिक आधार देत होत्या. खंडणीच्या आरोपात बेलतरोडी पोलिसांनी तिला बुधवारी अटक केली. तेव्हा ती आपण काही केलेच नाही, कशाला अटक करता, असा पोलिसांना प्रश्न करीत होती.
मंगळवारी सायंकाळी तिच्या नातेवाइकांनी रामदासपेठेतील एका मानसोपचार तज्ज्ञाकडे वेळ घेतली होती. मात्र, शीतलने उपचारासाठी जाण्याचे टाळले. ती आपल्याच विश्वात दंग राहायची. दरम्यान, तिने कुरियर कंपनीत पत्र टाकण्यासाठी जे काही केले. त्याचा क्राईम सीन रिक्रिएट बेलतरोडीचे ठाणेदार विजय आकोत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शीतलकडून करवून घेतला. तिच्या पीसीआरची मुदत संपल्याने शनिवारी तिला पोलीस न्यायालयात हजर करणार आहे.
आत्महत्येचाही केला होता प्रयत्न
शीतलने एकदा स्वत:च्या हाताची नस कापून तसेच गॅसजवळ स्वत:चे केस धरून जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशीही माहिती पुढे आली आहे. तिच्या या अविवेकीपणामुळे तिच्या नातेवाइकांना खास करून मुलींना जबर मानसिक धक्का बसला आहे.