नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहाच्या पुढाकारात पं. बच्छराज व्यास विद्यालयातील १९९९ च्या बॅचचे माजी विद्यार्थी आणि वसुंधरा सोशल फाऊंडेशनच्यावतीने रविवारी न्यू सुभेदार ले-आऊट येथील रावण दहन मैदानावर रक्तदान शिबिर घेण्यात आले. हेडगेवार रक्तपेढीच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडला.
पं. बच्छराज महाविद्यालयातील निवृत्त शिक्षक रमेशचंद्र दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या शिबिराचे उद्घाटन विद्यालयाच्या पर्यवेक्षिका रेणुका खळतकर यांनी केले. प्रमुख पाहुणे प्रदेश कॉंग्रेसचे सचिव गिरीश पांडव, वसुंधरा सोशल फाऊंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष समीर काळे, हेडगेवार रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील होते.
रमेशचंद्र दीक्षित म्हणाले, लोकमत महाराष्ट्रात क्रमांक एकवर आहे, तसे सामाजिक उपक्रमातही पहिल्या क्रमांकावर आहे. ‘लोकमत रक्ताचं नातंं’ या उपक्रमाच्या माध्यमातून समाजाला मदतीचा हात देण्यासाठी सर्व सामाजघटकांच्या सहकार्यातून एक पाऊल पुढे टाकले आहे.
रेणुका खळतकर म्हणाल्या, समाजासाठी काही देण्याची उदात्त भावना शाळेतून रुजवली. माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन केलेले हे महादान आहे. गिरीश पांडव आणि समीर काळे यांनीही मार्गदर्शन केले. संचालन सूरज वैद्य तर, आभार प्रभा चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमित बुग्गेवार, वनिता रागीनवार-गणेशवार, स्मिता फुलझेले-गेडाम, आशिष मनोहर, गौरव काळबांडे, अभिजित निंबुळकर, मोहित सावळकर, शैलेश निंबुळकर, सारंग तेलंग, सम्राट चौव्हाण, वर्षा रागीनवार-नालमवार, मेघा गणवीर, निलोफर पठाण, विजेता अलोणे-राऊत, दीपक गोंडे, मंगेश खळतकर, उमेश ढुमणे यांचे सहकार्य लाभले.