लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दीदी म्हणजे आपल्या आदरणीय भारतरत्न लता मंगेशकर. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नागपुरातील हार्मनी इव्हेंट्सने पुढाकार घेऊन मैत्री परिवार संस्थेच्या सहकार्याने ‘दीदी और मै ’...हा हिदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या संगीतमय कार्यक्र मादरम्यान लतादीदींचे बंधू पंडित हृदयनाथ मंगेशकर हे त्यांंच्या गीतांबद्दलच्या विविध आठवणी श्रोत्यांसोबत संवाद साधून उलगडणार आहेत. हर्मनी इव्हेंट्सचे राजेश समर्थ यांनी यासंबंधात गुरुवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. यावेळी प्रफुल्ल मनोहर, मैत्री परिवाराचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके, विजय जथे उपस्थित होते. राजेश समर्थ यांनी सांगितले, लतादीदींच्या अनेक असलेल्या गोष्टी, त्यांची गाणी कशी बनली, गाण्याच्या रेकॉर्डिंग अन् संगीत देताना घडलेले किस्से, अशा अनेक आठवणी पंडित हृदयनाथ मंगेशकर उलगडणार आहेत. २ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे हा संगीतमय कार्यक्रम होईल. यात स्वत: राधा मंगेशकर यांच्यासह मनिषा निश्चल अन् आकांक्षा नगरकर या प्रतिभावंत गायिका गाणी गाणार आहेत. मैत्री परिवार संस्थेच्या विद्यार्थी उन्नती गृहाच्या साहाय्यार्थ हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कांचन गडकरी राहतील.