लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पं. जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी दोन परस्परविरोधी भूमिका घेणारे प्रवाह आहेत. एक प्रवाह त्यांना आधुनिक भारताचा शिल्पकार मानतो तर दुसरा प्रवाह त्यांना इतर नेत्यांवर अन्याय करून पंतप्रधानपदासाठी आतताई करणारा, फाळणी घडविणारा मानतो. मात्र त्यांचे वैयक्तिक आयुष्य, धर्म याबाबत खोट्या गोष्टीद्वारे घृणास्पद टीका करणारा तिसरा प्रवाह १९२५ मध्ये देशात निर्माण झाला. याच प्रवाहाची टोळी सध्या सोशल मीडियावर पं. नेहरूंबाबत थैमान घालत आहे. त्यांना तशी टीका करण्याची मुभा पं. नेहरू यांनीच दिली. कारण त्यांनीच या देशात लोकशाही रुजविली आणि मजबूत केली आहे. त्यामुळे या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाविषयी नव्याने जाणण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राजकीय भाष्यकार व लोकमतचे संपादक सुरेश द्वादशीवार यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्रातर्फे शुक्रवारी धनवटे सभागृह येथे पं. जवाहरलाल नेहरू विशेष व्याख्यान सत्राचे प्रथम पुष्प गुंफताना ‘स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल नेहरू’ या विषयावर ते बोलत होते. त्यांनी पं. नेहरू यांच्या जन्मापासून त्यांचे शिक्षण, स्वातंत्र्य लढ्यातील प्रवेश आणि पंतप्रधान होईपर्यंतचा प्रवास उलगडला. ते काश्मिरातील ‘कौल’ या पंडित कुटुंबाचे वारस होते. प्रचंड वैभवात जन्मलेल्या नेहरूंच्या आयुष्यात कायम एकाकीपणा आला. त्यांच्यावर वडिलांचा दरारा होता, मात्र स्वतंत्र विचार करण्याची वृत्तीही होती. त्यांनी वडिलांच्या सांगण्यावरून नोकरीऐवजी वकिली स्वीकारली. यश मिळूनही मन लागत नसल्याने वकिली सोडून त्यांनी अलाहाबाद महानगरपालिकेची निवडणूक लढविली व मेयर झाले.पद आणि श्रीमंतीमध्ये त्यांना रस नव्हता. त्यांचे मन स्वातंत्र्य लढ्याकडे वळले होते. सुरुवातीला काँग्रेसमधील मवाळ गटापेक्षा लोकमान्य टिळकांच्या जहालवादी भूमिकेकडे ते आकर्षित झाले. मात्र याच काळात दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी चालविलेल्या लढ्यामुळे ते गांधीजीमुळे प्रेरित झाले. महात्मा गांधी भारतात आल्यानंतर ते त्यांच्या अनेक लढ्यात सहभागी झाले आणि हे ऋणानुबंध अधिक घट्ट झाले. असहकार सत्याग्रहाच्या आंदोलनामुळे पहिल्यांदा पं. नेहरू दीड वर्षासाठी कारागृहात गेले होते. मुलाच्या काळजीमुळे पुढे मोतीलाल नेहरू यांनीही गांधीजींचे अनुयायित्व स्वीकारले. गांधीजींच्या महात्म्यामुळे श्रीमंती, वैभव त्यागून देशसेवेत झोकून दिलेल्या त्यावेळच्या अनेक नेत्यांमध्ये त्यांचाही समावेश होता.नेहरू यांनी गांधीजींचे नेतृत्व स्वीकारले असले तरी अनेक गोष्टीवरून त्यांचे वाद व्हायचे. नेहरू यांच्यावर समाजवादाचा प्रभाव होता व हा प्रभाव काढण्यासाठी गांधीजींनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देऊन प्रयत्नही केले. तोपर्यंत पं. नेहरू हे देशवासीयांमध्ये लोकप्रिय झाले होते. मात्र या देशाने गांधीजींना स्वीकारले आहे असे ते मानत. त्यामुळे बहुतेक काँग्रेस नेत्यांच्या लोकप्रियतेचा आधारच गांधी आहेत, ही भावना त्यांनी अनेकदा व्यक्त केली. १९२१ पासून देशात झालेल्या वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला कायम यश मिळत गेले आणि यात पं. नेहरू यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या भूमिकेमुळे गांधीजींनी १९४२ मध्ये चले जाओचे आंदोलन पुकारले होते. ब्रिटिश शासनाशी बहुतेक स्वातंत्र्यविषयक वाटाघाटी त्यांनीच चालविल्या होत्या. महात्मा गांधी यांनी राजकीय वाटाघाटीचे नेतृत्व नेहरूंकडे व देशाची संघटनबांधणी करण्याची जबाबदारी सरदार पटेल यांच्याकडे दिली. यावेळी विविध राजकीय घडामोडींचा उल्लेखही द्वादशीवार यांनी केला. शनिवारी ते ‘पंतप्रधान जवाहरलाल नेहरू’ विषयावर व्याख्यान सत्राचे दुसरे सत्र गुंफणार आहेत.यावेळी अध्यक्ष म्हणून प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी यांनी व्याख्यान सत्राची भूमिका विषद केली. संचालन डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी केले. डॉ. प्रदीप विटाळकर यांनी आभार मानले.