नागपूर : संगीत रसिक म्हणा वा जाणकार तर सोडाच सर्वसामान्य माणसांच्या रसिकतेला चालना देणाऱ्या पद्मविभूषण पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतुरवादनाच्या स्वरतरंगांचा आस्वाद नागपूरकरांनाही घेता आला आहे. त्यांनी नागपूरकरांच्या मनावर प्रत्यक्ष सोडलेली छाप अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे.
नागपूरकरांच्या संगीत रसिकतेची जाण सर्वदूर आहे आणि त्यामुळेच देशातील महान संगीतकारांचा दीदार नागपूरकरांना झाला आहे. त्यात स्व. पं. शिवकुमार शर्मा यांचीही नोंद उल्लेखनीय ठरते. स्व. पं. शिवकुमार शर्मा यांच्या संतुरवादनाचे काही मोजकेच कार्यक्रम नागपुरात झाले आहेत. बहुधा हे सर्वच कार्यक्रम नागपुरातील प्रथितयश संस्था सप्तकने आयोजित केले आहेत. त्याच अनुषंगाने ११ ते १३ जानेवारी १९८९ मध्ये शंकरनगर येथील मूकबधिर विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या कै. एस.बी. बर्वे स्मृती संगीत महोत्सवात पं. शिवकुमार शर्मा यांचे संतुरवादन झाले होते.
या महोत्सवात पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन, शफात अहमद खान यांचे तबलावादन, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे बंदिशी गीत, पं. जयराज यांचे गायन व उस्ताद झाकीर हुसैन यांच्या तबलावादनाचा आनंद नागपूरकरांना घेता आला होता. या महोत्सवाचा गोडवा आजही नागपूरकर रसिकांच्या मनात कायम आहे. त्यानंतर ५ सप्टेंबर १९९९ रोजी पार पडलेल्या ‘विरासत’ या कार्यक्रमात पं. शिवकुमार शर्मा यांनी पुत्र राहुलसोबत संतुरवादन केले होते.
याच वर्षी ३ ऑक्टोबर १९९९ रोजी सप्तक व दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या आंतरमहाविद्यालयीन सुगम संगीत स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. त्यानंतर १ व २ फेब्रुवारी २००२ रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडलेल्या संगीत महोत्सवात पं. शिवकुमार शर्मा यांचे संतुरवादन झाले होते. पावसाच्या सरी नितळ पाण्यावर कोसळाव्या आणि त्याचे जे स्वर निसर्गात गुंजायमान व्हावे, असे त्यांचे संतुरवादन होते.