संजय क्रिपलानी : असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीजचा पदग्रहण सोहळालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : या वर्षी स्वच्छ समाज अभियान हाती घेण्यात आले आहे. यात मलेरिया, डेंग्यूवरील जनजागृतीचे कार्यक्रम राबविले जाणार असून या रोगावर नियंत्रण आणण्याच्या दिशेने पावले उचलली जातील, असे प्रतिपादन असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीज्चे (एएमएफ) नवनियुक्त अध्यक्ष डॉ. संजय क्रिपलानी यांनी येथे केले.असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीज्चा (एएमएफ) पदग्रहण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. सोहळ्याचे उद्घाटन विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे विभाग प्रमुख साधना कुळकर्णी व टाटा स्मृती हॉस्पिटलचे डॉ. अतुल कुळकर्णी उपस्थित होते.प्रकाश मुत्याल म्हणाले, डॉक्टर आणि रु ग्ण यांचे नाते दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील बदलते प्रवाह, रुग्णांची वाढलेली समज आणि संख्या, औषध कंपन्यांचा व्यवहार अशी अनेक कारणे त्यामागे आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील मूलतत्त्वे, औषध कंपन्यांचा सहभाग, दुरावलेली फॅमिली डॉक्टरची संकल्पना आणि डॉक्टरांचे बिघडलेले आरोग्य आणि डॉक्टर-रुग्ण नाती यांच्याकडे पुन्हा पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. दोघांमधील सुसंवाद वाढणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले. डॉ. अतुल कुळकर्णी यांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी कसा संवाद साधावा, यावर मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. संजय क्रिपलानी यांनी अध्यक्षपदाची, डॉ. इम्रान यांनी सचिवपदाची सूत्रे हाती घेतली. सोबतच डॉ. अमोल मेश्राम यांनी कोषाध्यक्ष, डॉ. पी. लहरवानी व डॉ. आसीफ कुरेशी यांनी उपाध्यक्षपदाची, डॉ. राजेश गजभिये व डॉ. उमेश रामतानी यांनी उपसचिवपदाचा पदभार स्वीकारला. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांच्या कार्याची दखल घेत वरिष्ठ कौटुंबिक चिकित्सक डॉ. रवींद्र झारिया, दंत चिकित्सक डॉ. अनिल चौधरी, बधिरीकरण चिकित्सक डॉ. भाऊ राजूरकर व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सकिना लिरानी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मलेरिया, डेंग्यूविषयी जनजागृती करणार
By admin | Published: July 10, 2017 1:33 AM