- मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. : प्रवासासाठी मेट्रोचा उपयोग करा
नागपूर : वाढत्या शहरीकरणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महत्त्वाची असून आरामदायक प्रवासासाठी नागरिकांनी मेट्रो रेल्वेचा उपयोग करावा, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागरिकांना केले. गुरुवारी महामेट्रोच्या अॅक्वा लाईन मार्गिकेवरील सीताबर्डी इंटरचेंज ते रचना रिंग रोड जंक्शन मेट्रो स्टेशनदरम्यान त्यांनी मेट्रोने प्रवास केला. त्यावेळी नागरिकांना उद्देशून ते बोलत होते.
अॅक्वा लाईन मार्गिकेवर बुधवारपासून दोन नवीन मेट्रो स्टेशन शंकरनगर चौक आणि रचना रिंग रोड जंक्शन नागरिकांच्या सेवेत सुरू झाले आहेत. तसेच ऑरेंज आणि अॅक्वा लाईन येथे दर १५ मिनिटांनी प्रवासी सेवा सुरू असून नागरिक याचा वापर करीत आहे. राधाकृष्णन म्हणाले, नागपुरात नागपूर मेट्रोच्या रूपात अतिशय चांगली वाहतूक प्रणाली तयार करण्यात आली आहे, आंतराराष्ट्रीय दर्जाची पायाभूत सुविधा उपलब्ध आहे. मेट्रोचे तिकीट दर सर्व सामान्यांना परवडणारे आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे शहराच्या कुठल्याही भागातून मेट्रो स्टेशनपर्यंत नागरिकांना पोहोचता येते. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करून पैसे वाचविण्यास मदत होत असून पर्यावरण राखण्यासदेखील मदत होते.
लास्ट माईल कनेक्टिव्हिटी अंतर्गत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याकरिता महामेट्रो आणि नागपूर महानगरपालिका नियोजन करीत आहे. कोरोना कालावधीमध्ये कमीत कमी व्यक्तींशी संपर्क साधून नागपूर मेट्रोने सुरक्षित आणि चांगला प्रकारचा प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले.