नागपूर : गोरेवाडा प्रकल्प क्षेत्रातील पक्षी आणि वनस्पतींची ओळख करून देणाऱ्या पुस्तक ाचे प्रकाशन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे, वन विकास महामंडळाचे व्यवस्थापक एस. पी. वडसकर, महासंचालक, प्रधान मुख्य वन संरक्षक अरविंदकुमार झा आदी उपस्थित होते. वन विकास महामंडळाच्यावतीने प्रकाशित करण्यात आलेल्या या पुस्तकात नेहमी आढळणाऱ्या पक्ष्यांपासून दुर्मिळ प्रजातींचे पक्षी आणि वनस्पतींची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाने २००८ मध्ये गोरेवाडा वनक्षेत्रातील वनराईचा अभ्यास केला होता. या अभ्यासात गोरेवाडा भागात २९४ प्रकारचे गवत, ७९ प्रकारचे वृक्ष आणि ४६ प्रकारच्या झुडूपांच्या प्रजाती आढळून आल्या होत्या. त्याचबरोबर सेवादल महिला महाविद्यालयाकडून याचवर्षी गोरेवाडा तलाव आणि परिसरातील पक्ष्यांचा अभ्यास करण्यात आला. यात पक्ष्यांच्या २०२ प्रजाती आढळून आलेल्या आहेत. यासर्वांची माहिती पुस्तिकेत देण्यात आली आहे. त्याचबरोबर ई-बुलेटिन व न्यू लेटरचेही उद्घाटन वनमंत्र्याच्या हस्ते झाले. (प्रतिनिधी)
गोरेवाडातील वन आणि जीव संपदेच्या पुस्तकाचे प्रकाशन
By admin | Published: December 30, 2015 3:25 AM