लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन साहित्य खंड मालिकेतील खंड-६ ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या मराठी अनुवाद ग्रंथाचे प्रकाशन येत्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट रोजी करावे, अशी मागणी भारतीय दलित पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी केली असून यासंदर्भात त्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमत्री उदय सामंत यांना निवेदनही सादर केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधन प्रकाशन समितीकडून गत अनेक वर्षांपासून एकही खंड प्रकाशित झाला नाही. समितीची स्थापना १५ मार्च १९७६ साली झाली असताना ४४ वर्षात केवळ २२ खंड व ३ सोअर्स मटेरियल प्रकाशित झाले. आता नव्याने समिती गठित झाली असून खंडाचे कामही पूर्ण झाले आहे. ‘द प्रॉब्लेम ऑफ रूपी’ हा एक महत्वपूर्ण विद्वत्तापूर्ण अर्थशास्त्रीय लिखान असलेला ग्रंथ आहे. हा खंड १० ऑक्टोबर १९८९ रोजी प्रकाशित झाला होता. गेल्या ३५ वर्षांपासून या खंडाचे पुनर्मुद्रणच झालेले नाही. स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट रोजी खंड प्रकाशित करून आंबेडकरप्रेमी नागरिकांना पुस्तकरूपाने भेट द्यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.