लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुलगाव येथील दारूगोळा स्फोट प्रकरणातील आरोपी कामगार पुरवठा कंत्राटदार शंकर माणिकलाल चांडक याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. तसेच, आरोपीचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.आॅर्डनन्स फॅक्टरी खामरिया, जबलपूर (मध्य प्रदेश) येथील दोषपूर्ण व मुदतबाह्य दारूगोळा नष्ट करण्यासाठी पुलगाव, जि. वर्धा येथील केंद्रीय दारूगोळा भांडारमध्ये आणण्यात आला होता. १९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत हे काम केले जाणार होते. हे जोखमीचे व अतिसंवेदनशील काम असते. त्यामुळे तज्ज्ञ चमूच्या निरीक्षणाखाली हे काम केले जाते. परंतु, खड्डे खोदणे, दारूगोळा ट्रकमधून खाली उतरवणे, तज्ज्ञ सांगतील त्या ठिकाणी दारूगोळा पोहोचविणे इत्यादी कामांसाठी कामगारांची आऊटसोर्सिंग केली जाते. अशा कामगारांची आऊटसोर्सिंग आरोपी चांडककडून करण्यात आली होती. तो अधिकृत कामगार पुरवठा कंत्राटदार आहे. २० नोव्हेंबर २०१८ रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास ट्रकमधून दोषपूर्ण दारूगोळा खाली उतरविताना एका बॉक्सचा जोरदार स्फोट झाला. त्यामुळे ६ जणांचा मृत्यू झाला तर, १८ जण गंभीर जखमी झाले. हे धोकादायक काम असताना त्यासाठी अकुशल व अप्रशिक्षित कामगार पुरविल्यामुळे चांडकविरुद्ध देवळी पोलिसांनी २५ नोव्हेंबर रोजी सदोष मनुष्यवध व सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हे दोन गुन्हे नोंदविले. या प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी चांडकने सुरुवातीला वर्धा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज २८ नोव्हेंबर रोजी खारीज झाला. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. चांडकतर्फे वरिष्ठ अधिवक्ता अविनाश गुप्ता तर, सरकारतर्फे अॅड. हर्षवर्धन धुमाळे यांनी कामकाज पाहिले.
पुलगाव दारूगोळा स्फोटातील आरोपीला जामीन नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 8:51 PM
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पुलगाव येथील दारूगोळा स्फोट प्रकरणातील आरोपी कामगार पुरवठा कंत्राटदार शंकर माणिकलाल चांडक याला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यास नकार दिला. तसेच, आरोपीचा यासंदर्भातील अर्ज फेटाळून लावला. न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.
ठळक मुद्देहायकोर्ट : २० नोव्हेंबरची घटना